नांदेडमधील उर्दू घर लवकरच सुरू होणार – पालकमंत्री अशोक चव्हाण

उर्दू घराच्या संचालनासाठी स्थानिक समिती स्थापणार – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई, दि. १० : नांदेडमधील उर्दु घराचे बांधकाम पूर्ण झाले असून ते लवकरात लवकर सुरू करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण यांची मागणी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मान्य केली. तसेच या उर्दु घराच्या परिचालनसाठी स्थानिकस्तरावर उर्दु अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी श्री. मलिक यांनी दिली.

नांदेडमधील उर्दु घर तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दफनभूमी, सद्भावना सभागृहाचे कामकाज यासंदर्भात श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी अल्पसख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, सहसचिव श्री. तडवी आदी यावेळी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री श्री.मलिक म्हणाले की, नांदेडमधील मदिना नगर येथे उर्दु घरचे बांधकाम करण्यात आले आहे. याचे परिचालन करण्यासाठी उर्दु अकादमीच्या स्तरावर स्थानिक समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्यामार्फत उर्दु घर उपक्रम चालविण्यात येईल. ग्रंथालय, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यासह सामाजिक उपक्रमासाठी उर्दु घराचा उपयोग होणार आहे.

श्री. चव्हाण म्हणाले की, उर्दु घराचे सुनियोजित परिचालनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचे सहाय्य घेण्यात यावे. ग्रंथालयाचा लाभ सर्वांना पूर्णवेळ व्हावा, यासाठी विद्यापीठाचे आणि मनुष्यबळासाठी महानगपालिकाचे सहकार्य घेण्यात यावे. उर्दु घरामध्ये उर्दु भाषेच्या प्रसारासाठी वर्ग सुरू करण्यात यावेत. तसेच शिक्षणविषयक उपक्रम सुरू करावेत.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाअंतर्गत धनेगाव येथे सद्भावना मंडप बांधकामासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या कामास चालना देण्यात यावी, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी यावेळी केली.