मानसिकतेत बदल घडविणारा आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

यंदाचा अर्थसंकल्प हा अनेक अर्थांनी दिशादर्शक
Image

मुंबई, 7 फेब्रुवारी 2021


यंदाचा अर्थसंकल्प हा अनेक अर्थांनी दिशादर्शक, मानसिकतेत बदल घडविणारा आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्या आज मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विषद करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

Image

करदात्यांच्या पैशातूनच सरकारी उद्योगांची उभारणी झाली आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक रूपया योग्य पद्धतीनेच खर्च व्हायला हवा, अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीने जनतेचा पैसा गुंतवला पाहिजे अशी भूमिका सितारमन यांनी मांडली. त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं आहे. आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यात सुसूत्रता नव्हती. मोदी सरकारनं प्रथमच यासंदर्भात सर्वंकष धोरण मांडल आहे. यापुढे केवळ धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील असं सांगतानाच करदात्यानं कर रूपात दिलेला प्रत्येक रूपया योग्य ठिकाणीच गुंतवला पाहिजे. अनेक क्षेत्रात पसरलेल्या सरकारी कंपन्यात केवळ पैसा ओतत राहणे आम्हाला मंजूर नाही. कराच्या प्रत्येक रूपयातून अधिकाधिक परतावा मिळायला हवा असे त्या म्हणाल्या.

गरिबांना सुरक्षा, युवा वर्गाच्या कौशल्याला वाव आणि उद्यमींना नवे अवकाश देत देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी हा कराचा पैसा वापरला गेला पाहिजे असे  सीतारामन म्हणाल्या. 

Image

आयात शुल्काबाबत सुधारणा प्रस्तावित आहेत. त्यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत सर्व संबंधित घटकांशी चर्चा केली जाईल. विचार विनिमयानंतर ऑक्टोबरमध्ये याबाबतच्या सुधारणा निश्चित केल्या जाणार असल्याचेही सीतारामन यांनी यावेळी सांगितले.