शरद पवारांच्या गुगलीने अजित पवार बोल्ड :महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा शरद पवारांचा निर्णय

शरद पवार फेरविचार करणार! दोन-तीन दिवसात घेणार निर्णय

मुंबई, २ मे  / प्रतिनिधी :-  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, तसंच आपण निवृत्त होत असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांच्या या निर्णयानंतर नेते आणि कार्यकर्त्यांनाही धक्का बसला. शरद पवारांचं आत्मचरित्र लोक माझे सांगाती, या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी या निर्णयाची घोषणा केली.

शरद पवारांचा हा निर्णय नेते आणि कार्यकर्त्यांसाठी धक्का होता. शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी नेत्यांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, पण शरद पवार निर्णयावर ठाम राहिले. दुसरीकडे कार्यकर्ते उपोषणालाही बसले, यानंतर निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी 2-3 दिवस द्या, पण उपोषण सोडा, असा निरोप शरद पवारांनी अजित पवारांकडे पाठवला. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना हा निरोप दिला, त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले. कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिल्वर ओक येथे सकाळपासून ठाण मांडून बसले होते. राजीनामा त्वरीत मागे घेण्यासाठी कार्यकर्ते हट्टाला पेटले असले तरी तातडीने आपला निर्णय जाहीर न करता दोन-तीन दिवसात या निर्णयावर पवारसाहेब फेरविचार करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी धाडल्याचे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावे, राज्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असेही पवारांनी सांगितले आहे.

त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी धरणे धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असेही अजित पवारांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, पवार साहेब असा निर्णय घेतील, असे कुणालाही वाटले नव्हते. कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केले होते. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत. आता पवारसाहेबांना विचार करायला वेळ द्या. तुम्हीही काहितरी खाभन घ्या. पवार साहेबांना आपला कार्यकर्ता उपाशीपोटी राहिल्याचे आवडणार नाही, तेव्हा सर्वांनी दोन-तीन दिवस वाट पहा, जे सर्वांच्या मनात आहे, तेच सर्वांच्या मनासारखे होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा शरद पवारांचा निर्णय

कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्यासाठी धरला हट्ट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे जाहीर केले आणि अवघा सभागृह स्तब्ध झाला.

शरद पवार म्हणाले, प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.

सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल,” असे शरद पवार यांनी जाहीर केले.