सरकार राष्ट्रीय पायाभूत प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा वाढवणार

 सार्वजनिक पायाभूत मालमत्तांचे मुद्रीकरण करण्यासाठी राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन सुरू

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की येत्या काही वर्षांत राष्ट्रीय पायाभूत प्रकल्प पाईपलाईन (एनआयपी) चे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारने पुढील तीन उपायांचा  प्रस्ताव दिला आहे:

  1. संस्थात्मक संरचनांची निर्मिती
  2. मालमत्तांच्या मुद्रीकरणावर अधिक भर
  3. केंद्र आणि राज्यांच्या तरतुदीत  भांडवली खर्चाचा वाटा वाढवणे

डिसेंबर 2019 मध्ये 6835 प्रकल्पांसह सुरु करण्यात आलेल्या एनआयपीचा विस्तार करण्यात आला असून  आता यात 7,400 प्रकल्प समाविष्ट असून काही महत्त्वाच्या पायाभूत मंत्रालयांतर्गत 1.10  लाख कोटी रुपयांचे  217 प्रकल्प पूर्ण झाले आहेत अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

पायाभूतप्रकल्पनावित्तपुरवठा– विकासवित्तीयसंस्था(डीएफआय)

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली  की,  विकास वित्तीय संस्था (डीएफआय) चा लाभ करून घेण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात  20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डीएफआय स्थापन करण्यासाठी विधेयक आणले जाईल जे पायाभूत सुविधांच्या अर्थसहाय्यासाठी प्रदाता, सक्षम व उत्प्रेरक म्हणून काम करेल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. तीन वर्षांच्या कालावधीत या डीएफआयसाठी कमीतकमी 5 लाख कोटी रुपये कर्जाचा पोर्टफोलिओ सुरु करण्याची महत्वाकांक्षा आहे असेही अर्थमंत्री  म्हणाल्या .

मुद्रीकरणाच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण उपाय पुढीलप्रमाणे

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पीजीसीआयएल यांनी प्रत्येकी एक इन्व्हिट प्रायोजित केले आहे जे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. अंदाजे पाच हजार कोटी रुपये किंमतीचे पाच कार्यान्वित रस्ते एनएचएआयआयएनआयव्हीटीला ( NHAIInvIT) हस्तांतरित केले जात आहेत. त्याचप्रमाणे, 7,000  कोटी रुपयांची पारेषण मालमत्ता पीजीसीआयएलआयव्हीआयटीमध्ये (PGCILInvIT) कडे हस्तांतरित केली जाईल.

रेल्वे समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यावर परिचालन आणि देखभालीसाठी कॉरिडोरच्या मालमत्तांचे मुद्रीकरण करेल.

संचालन व व्यवस्थापन सवलतीसाठी विमानतळांच्या पुढील समूहांचे मुद्रीकरण केले जाईल.

मालमत्ता मुद्रीकरण  कार्यक्रमांतर्गत कार्यान्वित केल्या जाणाऱ्या इतर मूलभूत पायाभूत सुविधा पुढीलप्रमाणे- एनएचएआय द्वारा  कार्यान्वित पथकर मार्ग  (ii) पीजीसीआयएलच्या  पारेषण  मालमत्ता (iii)  गेल, आयओसीएल आणि एचपीसीएल च्या तेल आणि वायू पाईपलाईन्स (iv) द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमधील एएआयचे  विमानतळ  (v) केंद्रीय गोदाम महामंडळ आणि नाफेड सारख्या सीपीएसईच्या गोदाम मालमत्ता (vi) स्पोर्ट्स स्टेडियम (vii) रेल्वेच्या इतर मालमत्ता