जल जीवन अभियान (शहरी) साठी 2,87,000 कोटी रुपये नियतव्ययाची घोषणा

शहरी स्वच्छ भारत अभियान 2.0 ला 1,41,678 कोटी रुपयांचे वाटप
आरोग्यासह शारिरीक कल्याण हा आत्मनिर्भर भारताच्या सहा महत्वपूर्ण स्तंभांपैकी एक

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

सार्वत्रिक आरोग्य सर्वव्यापी होण्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी, स्वच्छता व स्वच्छ वातावरणाचे महत्त्व वारंवार सांगण्यावर जागतिक आरोग्य संघटनेने भर दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 ने या क्षेत्रांना महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत.

जल जीवन अभियान (शहरी):


जल जीवन अभियान (शहरी) हे 2.86 कोटी घरगुती नळ जोडणीसह सर्व 4,378 शहरी स्थानिक संस्था, तसेच 500 अमृत शहरांमध्ये द्रव कचरा व्यवस्थापनासह सार्वत्रिक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येणार आहे. 2,87,000 कोटी रुपये खर्चाच्या या अभियानाची अंमलबजावणी 5 वर्षांत होईल.

स्वच्छ भारत, स्वस्थ भारत:

शहरी भारताच्या स्वच्छतेसाठी अर्थसंकल्पात संपूर्ण सांडपाणी, गाळ व्यवस्थापन आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया, कचरा स्त्रोत विभाजन, एकल-वापरातील प्लास्टिक कमी करणे, बांधकाम करणे किंवा पाडणे या कार्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करून वायू प्रदूषण कमी करणे आणि पूर्वापार असलेल्या कचरा संकलन स्थानांवर जैव उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरी स्वच्छ भारत अभियान 2.0 ची अंमलबजावणी  2021-2026 या कालावधीत एकूण 1,41,678 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतूदीसह केली जाईल.

स्वच्छ हवा


वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर तोडगा टाकण्यासाठी दहा लक्ष पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 42 शहरी केंद्रांना 2,217 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे.

स्क्रॅपिंग धोरण :

स्वयंचलित फिटनेस केंद्रात वाहनांच्या फिटनेस चाचण्या होतील – वैयक्तिक वाहनांच्या बाबतीत 20 वर्षानंतर आणि व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत 15 वर्षानंतर. योजनेचा तपशील स्वतंत्रपणे सामायिक केला जाईल.