सहा दरोडेखोर जेरबंद ,पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद, दिनांक 3 :
शिवाजीनगरात (कुंभेफळ) दरोडा टाकून एक लाख ९३ हजार ५०० रुपये किंमीचे सोन्याचे दागिने चोरुन लांबविल्या प्रकरणात करमाड पोलिसांनी सहा दरोडेखोरांना शनिवारी  दुपारी जेरबंद केले. दरोडेखोरांना पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी रविवारी दिले. विशेष म्हणजे सहा ही दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने फुलंब्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी आरोपींनी शिवाजीनगरात देखील दरोडा टाकल्याची कबुली पोलिसांना दिली.
राधेशाम उर्फ राजा रामराव चिखले (३२, रा. परतूर, जालना ह.मु. पुंडलीकनगर), बलवान चैनसिंग पवार (२५), भिमसिंग चैनसिंग पवार (३०, रा. दोघे रा. मुरादपूर ता.जि. गुणा मध्यप्रदेश, ह.मु. वंजारवाडी औरंगाबाद), राजेश उर्फ भालकर विठ्ठल सोळंकी (२०), हेमराज करणसिंग सोळंकी (१९, दोघे रा.सावंगी तुळजापूर शिवार ता.जि. औरंगाबाद), कृष्णा उर्फ बाळू धोंडीराम दहिवाळ (२५, रा. बाजी उमरद ता.जि. जालना, ह.मु. प्रकाशनगर, रामनगर औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात मंगेश हरिभाऊ झोरे (२६, रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा ह.मु. शिवाजीनगर कुंभेफळ) यांनी फिर्याद दिली होती. मंगेश झोरे हे ग्रुज कॉटन कंपनीत तर त्यांचे वडील हरिभाऊ झोरे हे हरमन फार्मा कंपनीत काम करतात. २३ मार्च रोजी मध्यरात्री झोरे कुटूंबीय जेवण करुन झोपी गेले होते. पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास  दरोडेखोर झोरे यांच्या घरात घुसले व त्यांनी मंगेश यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची  धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याचे पत्‍ते काढुन घेतले. कपाटातील सोन्याची दागिने काढण्याचा प्रयत्नात असताना हरिभाऊ झोरे यांना आवाज आल्याने त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केला, मात्र दरोडेखोरांनी त्यांच्याशी धक्‍काबुक्‍की केली. तसेच कपाटातील सुमारे एक लाख ९३ हजार ५००  रुपयांचे दागिने लांबविले. या झटापटीत आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने मंगेश झोरे जागी झाले. त्यांनी व त्यांच्या पत्नीने रुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर मंगेश यांच्या आई वडीलांनी त्यांच्या रुमचा दरवाजा उघडला.या प्रकरणात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान  सहा आरोपींना करमाड पोलिसांनी हर्सुल कारागृहातून ताब्यात घेत अटक करुन त्यांना रविवारी  न्यायालयात हजर केले. सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील सुर्यकांत सोनटक्के यांनी आरोपींकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जप्‍त करणे आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यार व वाहन जप्‍त करणे आहे. तसेच गुन्ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.