झोक्याचा फास बसल्याने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू ; वैजापूर तालुक्यातील आघूर येथील घटना

वैजापूर,३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- झोक्याचा फास बसल्याने एका सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आघूर येथे गुरुवारी (ता.1)  दुपारी घडली. पुष्पक सुभाषराव पोटे असे या घटनेतील मयत मुलाचे नाव आहे.पुष्पक हा शंकरपूर ता.गंगापूर येथील रहिवासी आहे. तो वैजापूर येथील आघूर येथे मामाच्या गावी आला होता.त्याचे आई वडील आघूर येथे शेती करत होते.

गुरुवारी दुपारी घरातील सर्व सदस्य मळणी यंत्र चालू असल्याने घराबाहेर गेले होते.त्यावेळी पुष्पक हा घरात झोका खेळत होता. खेळता खेळता झोक्याला पीळ बसला या फासात अडकून त्याचा दुर्दैवी अंत झाला. नातेवाईक घरात आल्यानंतर त्यांना ही घटना समजली.त्यांनी तातडीने त्यास वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केले. पुष्पक हा पोटे दाम्पत्याला दोन मुलींच्या पाठीवर अनेक दिवसांनी झालेला एकुलता एक मुलगा होता.तो इयत्ता पहीलीच्या वर्गात शिकत होता.त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.