केंद्रीय मंत्रीमंडळाने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या निर्यातीला दिली मंजुरी

 निर्यातीला वेगाने मंजुरी देण्यासाठी समिती केली स्थापन

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020

आत्मनिर्भर भारत या अंतर्गत भारत आपल्या विविध प्रकारच्या संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्रे उत्पादित करण्याच्या क्षमतांमधे वाढ करत आहे. आकाश हे देशातील महत्त्वाचे 96% स्वदेशी बनावटीचे  क्षेपणास्त्र आहे.

आकाश हे जमिनीवरून आकाशात 25 किलोमीटर लांबीपर्यंत  मारा करण्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 2014 साली भारतीय वायुसेनेत तर 2015 साली भारतीय लष्करात दाखल झाले.

हे क्षेपणास्त्र सेवेत दाखल झाल्यानंतर आकाश या क्षेपणास्त्रात अनेक मित्र राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, संरक्षण एक्स्पो, एरो इंडिया यावेळी रुची दाखविली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीमुळे भारतीय उत्पादकांना विविध देशांनी जारी केलेली माहितीची विनंती/प्रस्तावाची विनंती(RFI/RFP) यानुसार भाग घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.

आतापर्यंत भारतीय संरक्षण निर्यातीत सुटे भाग, घटक इत्यादी गोष्टींचा समावेश असे. मोठ्या शस्त्रास्त्रांची निर्यात मर्यादित होती. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या उपक्रमामुळे देशाला आपले उत्पादन विकसित करण्यास आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनविण्यास मदत होईल.

सध्या भारतीय सशस्त्र सेनेत समाविष्ट असलेल्या व्यवस्थेपेक्षा, आकाशची निर्यात करण्याची आवृत्ती वेगळी असेल.

आकाश व्यतिरिक्त, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, रडार आणि एअर प्लॅटफॉर्म सारख्या महत्वपूर्ण अन्य प्लॅटफॉर्म मधेही रस दाखविला जात आहे. अशा प्रकारच्या निर्यातिला वेगाने मंजुरी देण्यासाठी संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही समिती विविध देशांसाठी महत्वाच्या स्वदेशी निर्यातिला अधिकृत मान्यता देईल. तसेच ही समिती सरकार ते सरकार या मार्गासह इतर मार्गांचीही चाचपणी करेल.5 अब्ज डॉलर्सच्या उच्च संरक्षण निर्यातीचे लक्ष्य साध्य गाठण्यासाठी आणि इतर मित्र देशांशी सामरीक संबंध  सुधारण्यासाठी भारत सरकार लक्ष केंद्रित करत आहे.