ब्रिटन ते भारत आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील तात्पुरती स्थगिती आरोग्य मंत्रालयाने 7 जानेवारी 2021 पर्यंत वाढवली

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2020

ब्रिटनहून भारतात येणाऱ्या उड्डाणांना 7 जानेवारी 2021 (गुरुवार) पर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी शिफारस आरोग्य मंत्रालयाने नागरी उड्डयन मंत्रालयाला केली आहे.

आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) आणि डीजी, आयसीएमआर आणि सदस्य (आरोग्य), नीती  आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत  असलेल्या संयुक्त देखरेख गटा (जेएमजी) कडून प्राप्त माहितीच्या आधारे ही शिफारस केली आहे.

7 जानेवारी 2021 नंतर नियमांची काटेकोर अमलबजावणी सुनिश्चित करून ब्रिटनहून भारतात येणारी मर्यादित उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना देखील नागरी उड्डयन मंत्रालयाला करण्यात आली आहे. नागरी उड्डयन मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी सल्लामसलत करून अशा यंत्रणेची रचना करु शकते.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना संभाव्य “सुपर स्प्रेडर” कार्यक्रमाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्व घटनांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्सव आणि अनुषंगाने एकाच वेळी आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच वाढती  थंडी लक्षात घेत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी पत्र लिहिले आहे.    

गृह मंत्रालयाने राज्यांना नुकत्याच दिलेल्या सल्ल्याचा आणि मार्गदर्शनाचा आरोग्य मंत्रालयाने पुनरुच्चार केला आहे. गृह मंत्रालयाने आदेश दिला आहे की राज्ये / केंद्रशासित प्रदेश त्यांच्या विभागातील परिस्थितीच्या मूल्यांकनानुसार रात्रीची संचारबंदी या सारखे कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लाऊ शकतात. गृह मंत्रालयाने अशीही अट घातली आहे की व्यक्ती व वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि अंतर-राज्यीय हालचालींवर कोणतेही बंधन घालू नये. याकडे लक्ष वेधून आरोग्य सचिवांनी राज्यांना स्थानिक परिस्थितीचे त्वरित आकलन करून 30 आणि 31 डिसेंबर, 2020 तसेच 1 जानेवारी 2021 रोजी योग्य निर्बंध लावण्याचा विचार करावा.