विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पालघर ,२३ एप्रिल /प्रतिनिधी :

विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी दिले.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री 3 च्या सुमारास आग लागून 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षित स्थलांतराला प्राधान्य देत त्यांनी काही रुग्णांना दहिसर येथील मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर येथे हलवले, तर अन्य रुग्णांना विरारमधीलच विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. श्री. शिंदे यांनी मृतांच्या नातलगांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. याखेरीज महापालिकेच्या वतीनेही मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत श्री. शिंदे यांनी जाहीर केली.

रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर श्री. शिंदे यांनी पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तातडीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी व्हिजिलन्स पथक स्थापन करून खासगी तज्ज्ञांचीही मदत घेण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. याप्रसंगी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, पालघरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.