नांदेडमध्ये गोळीबार करून एका इसमाला लुटण्याची घटना

नांदेड,१५ जून /प्रतिनिधी:-  भरदिवसा गोळीबार करून एका इसमाला लुटण्याची घटना आज सकाळी मदिनानगर परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 

क्रेडिट अ‍ॅक्सिस ग्रामीण लि. या कंपनीचे केंद्र व्यवस्थापक रोहित गुगले हे सकाळी 8 वाजता बचट गटाच्या मिटिंगसाठी गेले होते. तेथून बचत गटाचे 57 हजार रुपये घेऊन दुचाकीने जात असताना मदिनानगर परिसरात त्यांचा पाठलाग करणार्‍या दोघांनी त्यांची मोटरसायकल आडविली. तोंड पूर्णपणे झाकलेल्या त्या दरोडेखोरांनी स्वत:जवळील बंदुकीतून भिंतीवर गोळीबार केला व त्यांच्याजवळील बॅग हिसकावली. हा प्रकार घडल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धेश्वर मोरे, पोलीस उपाधिक्षक चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे आदी घटनास्थळी धावले. पोलिसांनी नाकाबंदी केली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भरदिवसा झालेल्या घटनेने पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.