सुधाकरनगर, रेल्वे स्टेशन परिसरात वीजचोरांवर महावितरणची कारवाई

औरंगाबाद : रेल्वे स्टेशन परिसर व सुधाकरनगरात वीजचोरी करणाऱ्या 5 ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली आहे. या ग्राहकांनी 4985 युनिटची वीजचोरी करून महावितरणचे 70 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती छावणी उपविभागाचे प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी दिली.

महावितरणच्या वतीने शहरात वीजचोरी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. रिमोट कंट्रोल वापरून आणि मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरीची अनेक प्रकरणे महावितरणने नुकतीच उघडकीस आणली आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन परिसर व बीड बायपासवरील सुधाकरनगरमध्ये काही ग्राहक अनधिकृत वीज वापर  करीत असल्याची तक्रार महावितरणकडे प्राप्त झाली होती. त्यावर छावणी उपविभागाचे प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण, रेल्वे स्टेशन शाखेचे सहायक अभियंता सुनील सातदिवे व नक्षत्रवाडी शाखेचे सहायक अभियंता योगेश जाधव व तंत्रज्ञांनी मंगळवारी या परिसरात तपासणी केली. त्यात 5 ग्राहक वीजचोरी करताना आढळले. त्यांनी 4985 युनिटची वीजचोरी करून महावितरणचे 70 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले. या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना अनुमानित बिले दिली आहेत. बिले न भरल्यास त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी दिली.

छावणी उपविभागात वीजबिल वसुली मोहीम सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीसाठी छावणी उपविभागात मोहीम सुरू करण्यात आली आहे. वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना फोनवर तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून बिल भरण्याचा आग्रह करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जनता घरात अडकून होती. सर्वांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महावितरणने मोलाचे योगदान दिले. यापुढेही दर्जेदार व अखंडित विद्युतपुरवठा करता यावा यासाठी ग्राहकांनी आपले बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी केले आहे.