आरोपीचे रक्षण करणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी

औरंगाबाद, दिनांक 30 :तरूणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या अध्यक्षाला गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक करण्या ऐवजी पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी केली.

भाजप नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौकात राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

श्री. पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षावर बलात्कारा सारखा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असुन पत्रकार परिषदेतही बसण्याचे धाडस करत आहे. हे केवळ गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच होत आहे. ज्यावेळी बलात्काराचा गुन्हा दाखल होतो त्यावेळी पिडीतेवर कोणताही दबाव येऊ नये, पुराव्यामध्ये छेडछाड होऊ नये म्हणून आरोपीला तात्काळ अटक करून नंतर पुढची कारवाई केली जाते. ‘आरोपी असू तर शिक्षा भोगण्यास तयार आहोत’ असे विधान पत्रकार परिषद घेऊन केले जाते. जर तुमची बाजु बरोबर असेल तर गुन्हा दाखल होताच पोलिसांकडे सरेंडर होऊन तपासासाठी सहकार्य का केलं नाही? अशा पद्धतीने बाहेर मोकाट फिरून पिडीतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने खुद्द गृहमंत्र्यांनीच कायद्याला बगल दिली आहे.

राज्याचे, राज्यातील महिलांचे संरक्षण करणे हे गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे. गुन्हेगारांना संरक्षण देणे हे नव्हे. ‘शक्ती कायदा’ लागू करून जर गृहमंत्रीच आरोपीचे रक्षण करणार असेल तर कायद्याची अंमल बजावणी तरी कशी होणार. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सुप्रियाताई सुळे आणि रूपालीताई काकणकर हे अशा परिस्थितीत पिडीतेच्या बाजुने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजुने या आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालुन हा खटला शक्ती कायद्यानुसार फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीतेला न्याय द्यावा अशी मागणी श्री. विक्रांत पाटील यांनी केली.

पीडीतेला त्वरीत न्याय द्यावा, गृहमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अत्याचार प्रकरण जदलगती न्यायालयात चालविण्यात यावे, सरकारी वकी म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसच राज्य सरकारने अत्याचार प्रकरणी नव्याने तयार कायद्याप्रमाणे या प्रकरणात कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे.  

राजकीय षडयंत्रापोटी महेबूब शेख यांना अडकवण्याचा प्रयत्न – महेश तपासे

औरंगाबाद पोलिस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून महेबूब शेख या नावाचा उल्लेख असलेली तक्रार दाखल करण्यात आली. ही व्यक्ती कोण याचा तपास लागण्याआधीच तक्रारीत नाव घेण्यात आलेली व्यक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेच आहेत, असा दावा भाजपा नेत्यांनी केलाय. भाजपाकडून केवळ राजकीय षडयंत्रापोटी हा दावा करण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तक्रारीतील आरोप फेटाळून लावले आहेत. सामान्य घरातील व्यक्तीचे राजकीय आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त करू नये, दोषी असल्यास मिळेल त्या शिक्षेला सामोरे जाईन, असे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले. यावेळी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले उपस्थित होते.