जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप

औरंगाबाद, दिनांक 10 –  शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या अनाथ प्रमाणपत्रांचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज वाटप करण्यात आले. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या कामाचा आढावाही श्री. चव्हाण यांनी घेतला.

अनाथांना प्रमाणपत्र वाटप करताना महिला व बालविकास विभागाच्या प्रभारी विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख, शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह -2 चे अधीक्षक बी.एच. नागरगोजे, गजानन बालगृहाचे अधीक्षक जयराज नारायणकर, वसंतराव नाईक बालगृहाचे दीपक निमोने आणि सावली मुलींचे बालगृहातील संगीता सकदेव आदींसह माऊली बहुद्देशीय संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आणि अनाथ बालकांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी अनाथांना प्रमाणपत्र देताना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची विचारपूस करत त्यांना कौतुकाची थाप दिली. प्रमाणपत्र वाटप केल्यानंतर विभागाच्या कामाचा आढावा घेताना वन स्टॉप सखी केंद्रांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. महिलांच्या आरोग्य समस्यांचीही तपासणी करावी. त्यांचे योग्य समुपदेशन करावे, खचून गेलेल्या महिलांना मानसिक आधार देत त्यांना सर्वोतोपरी मदत करावी, अशा सूचना विभागाला दिल्या.

 सुरूवाातीला श्रीमती देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तसेच आभारही मानले. कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाचे समुपदेशक चंद्रकांत आव्हाड, परिविक्षा अधिकारी डी.एल. राठोड, विधी सल्लागार उत्तम शिंदे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी महादेव डोंगरे आदींचीही यावेळी उपस्थिती होती.