नवीन डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा आराखडा तयार करावा-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि.10):- लातूर महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या हद्दीत भूमिगत गटार योजना अंतर्गत शहराच्या उत्तर भागात एक व दक्षिण भागात एक असे दोन एसटीपी (सांडपाणी पुनर्वापर) प्रकल्प प्रस्तावित करावेत. यापूर्वी या प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेला निधी हा सन 2018 च्या डीएसआर प्रमाणे होता. तरी सध्याच्या डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करून शासनाला सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजना आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, एमजीपी चे अभियंता श्री. पाटील, श्री. स्वामी महापालिकेचे नगर अभियंता श्री चिद्रे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लातूर शहरातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक व्यवस्थित योजना निश्चित करावी. त्यासाठी शहराच्या उत्तर भागात वरवटी येथील जागा निश्चित केलेली आहे तर शहराच्या दक्षिण भागात कव्हा अथवा इतर जागा निश्चित करण्याबाबत महापालिकेने त्वरित कार्यवाही करावी. पूर्वीच्या योजनेला सन 2018च्या डीएसआर प्रमाणे 139.42 कोटी मंजूर असलेला निधी मध्ये हे काम होऊ शकते का याची खातरजमा करावी व गरज असेल तर सद्यस्थितीत आजच्या डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा नियोजन आराखडा शासनाला सादर करावा असे त्यांनी निर्देशित केले.

लातूर महानगरपालिकेने सुधारित डीएसआर प्रमाणे शासनाकडे सविस्तर आराखडा प्रस्तावित करावा व योजना मंजूर करून घ्यावी. तसेच योजनेची दोन टप्प्यांत विभागणी करून टप्पा निहाय कामे सुरू करावीत असेही निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.

महापौर व महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत इतर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या भूमिगत गटार योजना व सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची माहिती घ्यावी. व लातूर शहरासाठी पुढील पंचवीस तीस वर्षाचा विचार करून नियोजन आराखडा तयार करून योजना प्रस्तावित करावी. व ही योजना पुढील काळात आपग्रेड करता येईल या पद्धतीने तयार करावी अशीही सूचना श्री. देशमुख यांनी केली.

लातूर भुयारी गटार योजनेसाठी चांगला प्रस्ताव 750 कोटीचा होता परंतु एसटीपी प्रकल्पासाठी 139.42 कोटी निधी मंजूर केला होता. परंतु वरवटी पर्यंत पाईपलाईन 8 किलोमीटर घेऊन जावी लागणार असल्याने त्या करता किमान 22 कोटीचा वाढीव खर्च अपेक्षित असल्याची माहिती महापौर गोजमगुंडे यांनी दिली. या प्रकल्पाची पूर्वीची टेंडर प्रक्रिया रद्द करुन वाढीव मागणीसह प्रस्ताव शासनाला सादर केला असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

तसेच एमजीपी चे अभियंता श्री पाटील यांनी एसटीपी प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या एकूण 139 कोटी निधी मध्ये शहरातील गटारी मधील सर्व पाणी पाईपलाईनद्वारे वरवटी भागापर्यंत घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करणे प्रस्तावित असल्याचे सांगितले. ही योजना लातूर शहराची सन 2034 पर्यंतची लोकसंख्या ग्राह्य धरून करण्यात आलेली आहे. तसेच हा प्रस्ताव सन 2018 मध्ये त्यावेळच्या डीएसआर प्रमाणे सादर केला होता त्यामुळे आजच्या डीएसआर प्रमाणे याच्या मध्ये वाढ करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्री स्वामी यांनी पावर पॉइंट द्वारे एसटीपी योजना व वरवटी येथील सांडपाणी प्रकल्पाची माहिती दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *