मराठवाड्यात रस्ते ,पुलांसाठी ५५० कोटी रुपये,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची घोषणा 

मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य

औरंगाबाद, दिनांक 26 : मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. त्यानुसार या सुविधांचा विकास करण्यावर भर आहे. अति पावसामुळे अनेक रस्ते, पूल यांची दुरावस्था झालेली आहे. त्यांच्या दुरूस्तीकरिता मराठवाड्याला साडे पाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले.

जिल्ह्यातील पळशी- अंजनडोह आणि हर्सुल-जटवाडा क्षतीग्रस्त रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी मंत्री श्री.चव्हाण यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, कल्याण काळे, विलास औताडे, सुभाष झांबड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, उपअभियंता एस.जी. केंद्रे, शाखा अभियंता डी.एस.कांबळे आदींची उपस्थिती होती.

सुरूवातीला पळशी येथे ग्रामस्थांनी श्री.चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पळशीतील बेबीताई राठोड यांच्या शेतातील कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी श्री.चव्हाण यांनी केली. पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत शासनाने मदत जाहीर केलेली आहे, ती नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्याला मिळेल, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. यानंतर श्री. चव्हाण यांनी शामवाडी येथेही भेट दिली. तसेच हर्सुल- जटवाडा क्षतीग्रस्त रोडची देखील पाहणी करून या रस्त्यांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना श्री.चव्हाण यांनी केल्या.

राज्यात सत्तेत सहभागी होतांना मराठवाड्याला झुकतं माप देता आलं पाहिजे हि प्रामाणिक भावना आहे. शेतकरी व कामगार कायदा त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या कायद्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा कायदा आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात रस्ते, पूल दुरुस्तीसाठी २३५० कोटींचा समावेश आहे. मराठवाड्यात झालेल्या नुकसानीनंतर पीडब्ल्यूडीने सरकारकडे ५४२ कोटींची मागणी सादर केली आहे. त्याची दखल घेत आम्ही तातडीने ५५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.