जालना शहरातील रस्त्यांची कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश-सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण

जालना ,९ मार्च / प्रतिनिधी :- जालना शहरातील रस्त्यांची रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज मंगळवारी दिले असून शहरातील कन्हैय्यानगर परिसरातील रस्त्यांचा तिढा दुर करण्यासाठी दिल्ली व नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक लवकरच जालन्यात येणार आहे अशी माहिती आ. कैलास गोरंटयाल यांनी दिली आहे.
       जालना शहरातील कन्हैय्यानगर ते बाबूराव काळे चौक, कन्हैय्या नगर ते आदर्श चौक आणि बाबूराव काळे चौक ते सेंटमेरी या रस्त्यांचे काम मंजूर असून त्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे.मात्र,वनविभागाच्या तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात घेण्यात येत असलेल्या आक्षेपामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याने जालन्याचे आ. कैलास गोरंटयाल यांनी कन्हैय्यानगर व बायपास परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विधी मंडळाच्या मागील अधिवेशनात आग्रही भूमिका मांडत हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती.त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी आ. कैलास गोरंटयाल यांना आश्वासन दिल्यामुळे आज मंगळवारी चव्हाण यांनी त्यांच्या मुंबई येथील दालनात विशेष बैठक बोलावून जालना शहरातील कन्हैय्यानगर परिसरातील रस्त्यांची रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, जालन्याचे आ. कैलास गोरंटयाल यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीस वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री गुजर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संतोष शेलार, कार्यकारी अभियंता झालटे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवगिरी आदींची उपस्थिती होती. या बैठकीत झालेल्या चर्चेत जालन्यातील नकाशावर  सदर रस्ता दिसतो मात्र गुगल ॲपवर सदर रस्ता दाखवत नसल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या कामांना रोख लावली असल्याची बाब आ. गोरंटयाल यांनी या बैठकीत निदर्शनास आणून देत या रखडलेल्या रस्त्यांची कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याची मागणी या बैठकीत केली.

या मागणीची दखल घेऊन चव्हाण यांनी आज मंगळवारी  दुपारी झालेल्या बैठकीत सेंटमेरी ते बाबूराव काळे चौक या रस्त्यांच्या कामासाठी तात्काळ मंजुरी देत अन्य रस्त्यांच्या कामा संदर्भात प्रशासकीय पातळीवर आलेली अडचण दुर करण्यासाठी दिल्ली व नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक लवकरच जालन्यात पाठवून सदर प्रश्न देखील तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग,वनविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत चव्हाण यांनी दिल्याचे आ. कैलास गोरंटयाल यांनी सांगितले आहे.