स्वप्नांची सुञे दाखवणारा अर्थसंकल्प : राजेश राऊत

जालना ,११ मार्च / प्रतिनिधी :-पंचसूत्रीचे गोंडस नांव देऊन महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची तरतूद करण्यात आली नसून   शेतकरी, एसटी कामगार व सर्वसामान्यांना कुठलाच दिलासा न देता केवळ स्वप्नांची सूत्रे मांडणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी  उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी व्यक्त केली. 

पेट्रोल, डिझेल वरील कर कमी करून दिलासा देणे अपेक्षित असतांना तसे झाले नाही. सीएनजी वरील कमी केलेल्या कराचा लाभ फक्त मोठ्या शहरांतील वाहनधारकांना होईल. मुंबई,  पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून  या शहरांसाठी विशेष तरतूद करण्यात आली . मात्र मराठवाडा, विदर्भाची उपेक्षा दिसते. चार महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कामगारांना दिलासा देऊन परिवहन यंत्रणा सुरळीत करण्या ऐवजी नवीन एक हजार एसटी बसेस वाढविण्याची घोषणा करण्यात आली. “मराठवाडा वॉटर ग्रीड ” या महत्वकांक्षी योजनेस निधीची तरतूद केली नाही. विशेष म्हणजे जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा  अर्थसंकल्पात साधा उल्लेख करण्यात आला नाही. एकूणच राज्यातील जनतेला केवळ दिवास्वप्ने दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची टिका राजेश राऊत यांनी केली.