वैजापूरच्या तहसीलदारांना जेसीबी अंगावर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न ; वाळू माफियांची दादागिरी

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :-वाळूपट्टयात अवैधरित्या वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर जेसीबी यंत्राच्या टोकदार बकेटने हल्ल्याचा प्रयत्न करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी भल्या सकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील लाखणी येथील शिवना नदीच्या पात्रात घडली. याप्रकरणी जेसीबी चालकासह अन्य माफियांविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेमुळे महसूल विभागाचमध्ये एकच खळबळ उडाली असून वाळूमाफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे या घटनेवरून सिध्द होते. 
तालुक्यातील लाखणी येथील शिवना नदीच्या पात्रातून जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचे उत्खनन सुरू असल्याची टिप तहसीलदार राहूल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार गायकवाड यांनी आपल्या सुरक्षारक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ते लाखणी येथील वाळूपट्टयाकडे निघाले. तेथे पोहचल्यानंतर त्यांना वाळूपट्टयात विनाक्रमांकाच्या जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचे उत्खनन करून ती हायवा ट्रकमध्ये भरली जात असल्याचे निदर्शनास आले. तहसीलदार राहूल गायकवाड यांनी जेसीबी यंत्र व हायवा ट्रक पकडल्यानंतर दोन्हीही वाहने वैजापूर येथील तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. त्यानंतर जेसीबी चालकाने भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून त्याच्या एका सहकाऱ्याला बोलावून घेतले. त्यांनी दोघांनीही वाहने सोडून द्या. असे तहसीलदारांना सांगितले. परंतु त्यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे नंतर आलेल्या रामनाथ मुळे थेट त्यांच्या अंगावर जेसीबी चालविण्याचे  फर्मान सोडल्यामुळे  जेसीबी चालकाने मागेपुढे न पाहता रागाच्याभरात जेसीबी यंत्राची टोकदार बकेट थेट तहसीलदारांसह सुरक्षारक्षक व अन्य दोन कर्मचाऱ्यांच्या अंगावर नेत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सर्वांनीच प्रसंगावधान राखून सुटका करून घेतल्याने ते बचावले. त्यानंतर दोघेही तेथून फरार झाले.

घटनेनंतर तहसीलदारांनी शिऊर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर  पोलिस वाळूपट्टयात आले. तोपर्यंत वाळूमाफियांनी तेथून पळ काढला होता.  तत्पूर्वी या ठिकाणी अन्य काही वाळूमाफिया पट्ट्यात येऊन थांबले होते. परंतु नंतर त्यांनी तेथून पोबारा केला. याप्रकरणी तहसीलदार राहूल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामनाथ मुळे याच्यासह जेसीबी चालक व अन्य माफियांविरुध्द वाळूचोरीसह प्राणघातक हल्ल्ला करणे, शासकीय कामात अडथळा व अन्य विविध कलमान्वये शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वीही तत्कालीन उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे यांच्या अंगावर वाळूमाफियांनी ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गोदापात्रात ही घटना घडली होती. वाळूमाफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनास ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. 
माफियांना पोलिसांचे पाठबळ
दरम्यान महसूल विभागाचे अधिकारी जरी वाळूमाफियांविरुध्द कारवाई करीत असली तरी पोलिसांचा वरदहस्त वाळूमाफियांवर असल्यामुळे ते कुणालाच जुमानायला तयार नाही. विशेषतः वीरगाव व शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बहुतांश वाळूपट्टे येतात. त्यामुळे वाळूमाफियांवर या दोन्हीही पोलिस ठाण्यांचा वरदहस्त आहे. त्यांच्या अलिखित परवानगीनेच त्यांच्या हद्दीतील वाळूपट्टयातून तस्करी चालते. पोलिसांचा वरदहस्त वाळूमाफियांवर असल्यामुळे ते कुणालाच जुमानायला तयार नाही. परिणामी माफियांची थेट तहसीलदारांवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्यापर्यंत मजल गेली.