सदा सरवणकर अडचणीत; पिस्तूल जप्त

घटनास्थळावरुन बंदुकीच्या गोळीची पुंगळी जप्त

मुंबई : प्रभादेवी येथील ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकारण चांगलेच तापलेले असताना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या गोळीबारप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून बंदुकीच्या गोळीची पुंगळी जप्त करण्यात आल्याने पोलिसांकडून त्यांना समन्सदेखील बजावण्यात आले आहे.

गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून शनिवारी रात्री प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु आहे. यामध्ये पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान, सरवणकर यांनी गोळी झाडल्याची तक्रार ठाकरे गटाने केली आहे.

याच मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी वाढली. याप्रकरणी पोलिसांनी सरवणकर यांच्यासह इतर लोकांविरोधात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस सरवणकर यांची पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर तपासादरम्यान घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीची पुंगळी जप्त करण्यात आली आहे.

पोलिस ठाण्याच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गोळीबार झाल्याची जवळजवळ खात्री पटली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या सबळ पुराव्यावरून दादर पोलिसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरसह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम लावण्यात आले आहे.