राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन

ऐतिहासिक मोती तलावाची पाहणी आणि जिजाऊ सृष्टीला भेट

बुलडाणा,४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव राजवाड्यातील राजमाता जिजाऊ यांच्या  जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन

राज्यपालांसह पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या सहायक संचालक जया वहाने, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत आदी उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजवाडा परिसराची पाहणी केली. दरवाजावर असलेले वैशिष्ट्यपूर्ण नारळाचे दगडी तोरण, दरवाजाच्या आतील नगारखाना, तसेच इतर वास्तूंची माहिती त्यांनी जाणून घेतली. राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले.

मंदाकिनी खंडारे या गाईडने त्यांना राजवाड्याविषयी सर्व माहिती दिली. जाधव घराण्याचे वतीने शिवाजीराजे जाधव यांनी राज्यपालांचा सत्कार केला. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट दिल्याने मी स्वतःला धन्य समजतो. मी या भूमीला नमन करतो, असे उद्गार माध्यमांशी बोलताना राज्यपाल यांनी काढले.

या ऐतिहासिक स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा, असे आपण पालकमंत्री डॉ. शिंगणे यांना सांगितले असून येथे देश विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढून अर्थचक्राला गती मिळेल, अशा पद्धतीने विकासाचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती त्यांनी  यावेळी दिली.

मोती तलावाची पाहणी

राज्यपाल  कोश्यारी यांनी सिंदखेड राजा येथील  ऐतिहासिक मोती तलावाची पाहणी केली.

यावेळी शिवाजीराजे जाधव यांनी तलावाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. या तलावातून होणाऱ्या सिंचन व्यवस्थेची रचना तसेच तलावातील अतिरिक्त पाण्याचा सांडव्यातून होणारा निचरा याबाबतही माहिती दिली.

या तलावाच्या परिसरात वृक्ष लागवड करावी, तसेच संवर्धन करावे, असे निर्देश राज्यपालांनी  यावेळी प्रशासनाला दिले.

जिजाऊ सृष्टीला भेट

राज्यपाल  कोश्यारी यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीला भेट दिली. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. तसेच परिसराची माहिती जाणून घेतली. परिसरात वृक्षारोपण करून सुशोभिकरण करावे असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांचे सिंदखेडराजा येथे आगमन झाले.  शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, यांनी त्यांचे स्वागत केले. पोलिस दलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.