परभणी जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा – आरोग्य‍ मंत्री राजेश टोपे

परभणी, दि. 19 :- कोविड-19 विषाणूची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड-19 मधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तीची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड-19 आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे, आरोग्य सभापती श्रीमती अंजली आणेराव, जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री टोपे म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड-19 मधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधित व्यक्ती ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलेला आहे त्या सर्वांची चाचणी करावी. यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगून याबाबत आरोग्य यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. आरोग्य विभागातील सर्व डॉक्टरांनी कोविडमध्ये तत्परतेने काम करावे. याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावे. तसेच या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचा अभाव असता कामा नये. यासाठी डॉक्टर्स, नर्स कमी पडत असल्यास ते कंत्राटी तत्वावर थेट मुलाखतीच्या माध्यमातून नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे प्रक्रिया राबवावी. परंतु कोविडच्या रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड सेवेसाठी 24 तास वॉररुम उपक्रम उपलब्ध असल्याने याचे मंत्री महोदयांनी कौतूक केले. तसेच टेली आयसीयुही बसवावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील कोविडबाबतची सर्व माहिती नियमितपणे डॅशबोर्डवर अपलोड करावी जेणेकरुन कोविडविषयक माहिती सर्वाना उपलब्ध होईल. टेस्ट पर मिलियन वाढविणे गरजेचे असून शंभर टक्के डॉक्टरांना कोविडमध्ये काम करण्यासाठी समाविष्ट करावे. तसेच या आपत्तीच्या कालावधीत आयएमएच्या डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे सांगून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णालयांचा समावेश असल्याने त्याचा फायदा सर्व नागरिकांना मिळवून द्यावा, असेही श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी जिल्ह्यातील कोविड-19 परिस्थितीबाबत सविस्तरपणे सादरीकरणाद्वारे माहिती उपलब्ध करुन दिली. तसेच यावेळी आरोग्य मंत्री श्री.टोपे यांच्याहस्ते कोविड दरम्यान सर्वोकृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा व संबंधितांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्यासह आरोग्य विभाग आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.