अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी-धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहणार
गेवराई , माजलगाव आणि वडवणी या ३ तालुक्यातील १० गावातील अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची केली पाहणी
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे थेट शेताच्या बांधावर

बीड, दि. १८ ::– परतीच्या अतिवृष्टीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत असून पिकविम्याासह नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. परतीच्या पावसाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन आदी पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुंडे यांनी जिल्ह्यातील ३ तालुक्याच्या ९ गावातील आहेत . यावेळी हिरापूर शिवारातील अंबादास तुकाराम ढेंगळे या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देताना ते बोलत होते.

या दरम्यान गेवराई तालुक्यातील हिरापुर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद सदस्य विजय सिंह पंडित, उप विभागीय अधिकारी श्री. टिळेेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, माजी आ. अमरसिंह पंडित, महसूल, कृषी आदी विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या पाहणी दौऱ्या दरम्यान विविध गावात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने थांबून शेतकरी पालक मंत्री यांच्याशी भेटण्यासाठी वाट पाहत असल्याचे दिसून आले यावेळी प्रत्येक ठिकाणी थांबून त्यांच्या अडचणी व भावना समजावून घेऊन त्यांना धीर देण्याची भूमिका पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली.

यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा परतीचा पाऊस झाला आहे तेथे प्रत्यक्षात शेतात जाऊन संबंधित मंत्री पाहणी करत आहेत. मागच्या अनेक वर्षात असा अतिवृष्टीचा पाऊस झाला नाही असे अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांचे म्हणणे असून प्रत्यक्षात शेतात पाहणी केली असता शेतात पाणी साचले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या हातात काहीही पीक राहिले नसल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी व उभा राहण्यासाठी या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील असे सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार प्रकाशदादा सोळंके आणि प्रमुख वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह माजलगाव तालुक्यातील विविध तालुक्यातील पिक नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना धीर देण्याची भूमिका पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली.फुले पिंपळगाव येथील शेतकरी शेख शब्बीर शमशोद्दिन यांच्या चार एकर शेतातील सोयाबीनचे क्षेत्र यामुळे वाया गेल्याचे दिसून आले यावेळी बोलताना पालक मंत्री श्री. मुंडे म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असून मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात असून शासनस्तरावरून यापूर्वी पंचनामे झाले आहेत परंतु सरकार म्हणून या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

वडवणी तालुक्यातील पुसरा आणि मोरवड या गावातील पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आजच्या दौऱ्यामध्ये भेट दिली. त्यांनी मोरवड गावातील अंगद मारुती शेळके या शेतकऱ्याच्या शेतात पाहणी केली असता त्यांनी लावलेला ७ एकर कपाशी, सोयाबीन हे पीक काढण्यासाठी देखील राहिले नसल्याने हतबल झाल्याचे दिसून आले. त्यांनी पिक विमा घेतलेला असला तरी झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन जास्तीत जास्त मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील असे यावेळी सांगण्यात आले आणि याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले , यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने जिल्ह्यात सोयाबीन कापूस सह विविध पिकांची चांगली पेरणी झाली होती. तसेच येणाऱ्या पीक उत्पादनाची मोठी अपेक्षा शेतकरी वर्गास होती. परंतु परतीच्या पावसाच्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याच्या हातातले पिक गेले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने कापणी पूर्वी नुकसान झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी कापणी झालेलं सुगी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये . यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे . यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर- बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके , जिल्हाधिकारी श्री. रेखावार, उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड , जिल्हा कृषी अधिकारी श्री.निकम आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.