रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई:कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त

छत्रपती संभाजीनगर,८ मार्च / प्रतिनिधी :-ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामागे खंबीरपणे उभे असलेले युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई केली आहे. बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे शरद पवार व रोहित पवार यांना लोकसभेपूर्वी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. ईडीने कारवाई केलेल्या कारखान्याची किंमत ५० कोटी २० लाख आहे. तेथील १६१ एकर जमीनही ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे.

बारामती अ‍ॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कन्नड सहकारी साखर कारखाना दिवाळखोरीत निघाल्यानंतर राज्य सहकारी बँकेने लिलाव केला. हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने ५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोची चौकशी केली. रोहित पवार यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकांतले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आला.

बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं कारवाई केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांची या आधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे.

‘भाजपामध्ये जायला पाहिजे का?’

या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. तसेच भाजपामध्ये जायला हवं का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

 “माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर #लडेंगे_जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे.

“माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, असं दिसतंय”, असंही रोहित पवार म्हणाले.

“माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?”, अशी प्रतिक्रिया देऊन रोहित पवार यांनी स्माईलीची इमेज टाकली आहे. पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय”, असेही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, “ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.”