महिला सक्षमच…गरज आहे फक्त आर्थिक सक्षमीकरणाची-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर,७ मार्च / प्रतिनिधी :- अगदी पुरातनकाळापासूनचा इतिहास अभ्यासला तरी असे दिसून येते की महिला ह्या सक्षमच आहेत. जिथला कारभार महिलांच्या हाती असतो ते घर असो वा संस्था नेहमीच प्रगती करते. आता गरज आहे ती महिलांना आर्थिक सक्षम करण्याची, त्यासाठीची उर्जा यानिमित्ताने घ्यावी,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला सन्मान मेळावा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या मेळाव्यास नाबार्डचे महाव्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा अग्रणी बॅंक समन्वयक मंगेश केदारे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प व्यवस्थापक  अशोक शिरसे, माविमचे समन्वयक चंदनसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामिण भागात नेहमीच्या प्रथांविरुद्ध काम करायला महिला धजावत नाहीत. मात्र सावित्रीबाई फुलेंनी असा विचार केला असता तर आपल्या पैकी कुणीही शिकू शकला नसता. आपला हेतू जर चांगला असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करु नका. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. त्यांच्यात आर्थिक साक्षरता निर्माण झाली पाहिजे. बॅंकांचे व्यवहार त्यांना जमले पाहिजे. एखादे उत्पादन केल्यानंतर त्याचे पॅकेजिंग, मार्केटींग, अकाऊंटींग असे सर्व आर्थिक व्यवहाराचे ज्ञान त्यांना झाले पाहिजे, त्यासाठी या कार्यक्रमातून आपण प्रेरणा घेऊ या असे त्यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते माविम मधून उद्योजिका झालेल्या अर्चना शितोळे, तसेच लोकसंचालित साधन केंद्राच्या गंगापूर येथील सुरेखा उद्दे, पैठणच्या सुमन नरवाडे, लासूरच्या मीना वाघ, वाळूज च्या संगिता अडसूळे, शेंद्रा येथील सावित्रीबाई थोरे यांना सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक चंदनसिंग राठोड यांनी तर सूत्रसंचालन प्रियंका काळे यांनी केले.