महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 10 : महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे, अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भातील वृत्तांकन करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे, संचालक श्री.अजय अंबेकर, संचालक श्री.गणेश रामदासी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भातील विविध घटनांबाबतचे वृत्त माध्यमांतून प्रसारित होत असते. यासंदर्भातील वृत्तांकन करताना माध्यमांकडून योग्य ती दक्षता नेहमीच घेतली जाते. मात्र तरीही यासंदर्भातील वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने करणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करण्यात यावे. तसेच पोक्सो कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) सुधारित अधिनियम 2006, अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम 1956 या व तत्सम विविध कायद्यासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन करतानाही पीडित महिला व बालकांबाबत पुरेपूर संवेदनशीलता जपण्यात यावी.  माध्यम प्रतिनिधींसाठी यासंदर्भात विशेष जागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नेहमीच अशा विषयात संवेदनशील राहिलेले आहे परंतू उपलब्ध मनुष्यबळाला आणखी सक्षम, कार्यक्षम व प्रशिक्षित करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहाय्य करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. महासंचालनालय सर्वांसाठीच ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखत असून उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सचिव तथा महासंचालक डॉ.पांढरपट्टे यांनी डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले.