अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर;महायुतीच्या जागावाटपावर होणार चर्चा

छत्रपती संभाजीनगर,४ मार्च / प्रतिनिधी :-भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. राजकीयदृष्ट्या अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात असून, त्यांच्या याच दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होणार आहे. अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यावर शाह हे मुंबईला मुक्काम करणार आहेत. त्यामुळे मुंबईत आज महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

भाजपकडून लोकसभा उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातील महायुतीत अजूनही जागावाटपावर कोणताही निर्णय होऊ न शकल्याने, महाराष्ट्राला उमेदवारांच्या नावाच्या पहिली यादीतून वगळण्यात आले आहे. काही जागांवर भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, अमित शाह महराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून अमित शाह हे महायुतीमधील जागावाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील अशी चर्चा आहे. 

तीन जिल्ह्याचा दौरा…

विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी 1 वाजता बैठक आटोपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होतील. जळगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. जळगावची सभा झाल्यावर शाह हे सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची दुसरी सभा होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आगमन व स्वागत

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. सुभाष भामरे,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,आ. प्रशांत बंब तसेच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.