माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या धाडसत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला निषेध

हा प्रकार राजकीय चारित्र्य हनन करण्याचा-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मुंबई ,२४ एप्रिल /प्रतिनिधी 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या धाडसत्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला. राजकीय नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे हे कृत्य असून निष्कर्ष समजण्याआधीच धाड करणं आणि बाहेरील सामान आत घेऊन जाण्याची घटना हे अतिशय आक्षेपार्ह आहे. त्यामुळे हा प्रकार राजकीय चारित्र्य हनन करण्याचा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेचा पूर्णपणे निषेध करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

अँटेलिया प्रकरणात ज्यांना अटक झाली. तसेच ज्यांना राज्य सरकारने त्यांच्या पदावरून दूर केलं आहे अशांनी केलेल्या आरोपावर प्राथमिक चौकशी करण्याच्या सूचना हायकोर्टाने दिल्या होत्या. सीबीआय चौकशी करणार याचा आदर ठेवूनच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यांची चौकशी झाली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जो निष्कर्ष निघायला हवा होता तो निघालाच नाही. या प्रकरणात अटक झालेले अधिकारी किंवा सरकारकडून दुखावलेल्या अधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतली आहे, हे जगजाहीर आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून राज्यातील प्रमुख नेत्यावर प्राथमिक निष्कर्षावरून धाड घातली. तसेच या धाडीची प्रसिद्धी देशभर देणे म्हणजे त्या नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे कृत्य आहे. सीबीआयचा वापर राजकीयदृष्ट्या विरोधी पक्षातील लोकांना नामोहरम करण्याची पहिली वेळ नाही, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

आजवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर किती धाडी झाल्या आणि देशातील वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर किती धाडी झाली हे गणित पाहिले तर तिकडे शून्य आकडा आहे तर इकडे फार मोठी संख्या आहे. सीबीआयचा गैरवापर होत असल्याचे जनतेला कळून चुकलं आहे. यात एक आग्रह आहे की आज झालेल्या धाडीत तुम्हाला जे अयोग्य वाटेल ते जनतेच्या तात्काळ समोर यायला हवे. सीबीआयने प्राथमिक चौकशीचा निष्कर्ष जो काढला तो कोर्टासमोर मांडावा व तो आम्हालाही कळायला हवा अशा दोन मागण्या जयंत पाटील यांनी केल्या आहेत.

तसेच अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कोणीतरी म्हणालं म्हणून केवळ ऐकीव गोष्टींवर कठोरपणे व शेवटच्या टोकाची कारवाई करणं चुकीचं आहे. भाजपच्या नेत्यांवर असे अनेक गंभीर गुन्हे आहेत. मात्र दुर्दैवाने त्यावर काहीच होत नाही. या देशात न्याय राहिलेला नाही. न्याय करण्यासाठी असलेल्या यंत्रणेचा गैरवापर करण्याची पद्धत सुरु झाली आहे. मात्र महाराष्ट्राची जनता पूर्णपणे जागरूक आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना कोणीही भीक घालणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जास्त प्रमाणात सलत आहे. राष्ट्रवादीची ताकद वाढू नये याचा पुरेपूर प्रयत्न हे लोक करत असतात. मागील काळात अत्यंत संकटात आदरणीय खा. शदर पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचे जे नेत्रदीपक यश दाखवलं त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद काय आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला नामोहरम करणे हा एककलमी कार्यक्रम भाजपचा दिसत आहे असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जात आहे-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जात आहे. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जे खरं आहे ते बाहेर येणार असून जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असा विश्वासदेखील नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

सीबीआयला संशय असल्यास ते चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा ही दाखल करु शकतात. परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापध्दतीने हे प्रकरण तयार करण्यात आलेले आहे यावरुन हे राजकारणच सुरू असल्याचा आरोप ना. नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊन अहवाल सादर करायला सांगितले होते. परंतु ज्यापध्दतीने आज सीबीआयने जे धाडसत्र सुरू केले, त्यावरुन सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयासमोर प्राथमिक अहवाल ठेवला का? कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही किंवा आमच्याकडे ती उपलब्धही नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

कायद्यापुढे कुणीही मोठा नसतो. सीबीआय चौकशीला अनिल देशमुख यांनी सुरूवातीपासून सहकार्य केले आहे. ही घटना अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची असून त्या प्रकरणातील सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होते, याबाबतचा एनआयएने अद्याप खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भूमिका काय होती? असे प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित यावेळी केले आहे. परमवीर सिंह यांच्या पत्रावरून कारवाई होतेय यावरूनच हे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते असेही मलिक म्हणाले.