देवेंद्र फडणवीसांना जीवेमारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

७ मार्चपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

मुंबई,३ मार्च / प्रतिनिधी :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या व्हिडीओमागील मुख्य आरोपी किंचल नवले याला साताऱ्यातून अटक करण्यात आली आहे. किंचक नवलेला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हायरल व्हिडीओतील मुख्य आरोपी किंचक नवलेला साताऱ्यातून अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून किंचक नवलेचा शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचं तपासात समोर आलं. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली.

हा व्हिडीओ आपल्या ‘एक्स’ हँडल म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवरून व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे. योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे. त्यालाही ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.