अंगावर रॉकेल टाकून पत्नीला जिवंत जाळले,दारुड्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

वैजापूर ,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-सकाळी लवकर उठली नाही म्हणून रॉकेल अंगावर टाकून पत्नीला जिवंत जाळल्या प्रकरणी दारुड्या पतीला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायधीश एम.मोहियोद्दीन एम.ए.यांनी बुधवारी ठोठावली.

ज्ञानेश्वर कचरू वरपे (32 वर्ष) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.त्याने पत्नी शोभा हिस शिवीगाळ व मारहाण करून जिवंत जाळले होते. ही घटना 4 ऑगस्ट 2016 रोजी शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेतील आरोपी ज्ञानेश्वर हा छोटा हत्ती मालवाहू रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका चालवीत होता. त्याला आठ वर्षाचा अर्जुन व दहा वर्षांची पल्लवी अशी दोन अपत्ये आहेत.ज्ञानेश्वरला दारू पिण्याची सवय होती.चारित्र्यावर संशय घेऊन तो पत्नी शोभा हिस नेहमीच मारहाण करून तिचा छळ करीत असे.या त्रासाला कंटाळून शोभा माहेरी निघून गेली होती. पण काही दिवसानंतर ज्ञानेश्वर तिला पुन्हा सासरी घेऊन आला.4 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर हा खूप दारू पिऊन घरी आला व शिवीगाळ करून पत्नी व मुलांना मारहाण करू लागला. मारहाण केल्यामुळे पत्नी शोभा ही दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर न उठल्यामुळे ज्ञानेश्वर याने तिला शिवीगाळ करून तिच्या अंगावर रॉकेलं टाकून तीस पेटवून दिले.त्यावेळी दोन्ही मुले घराबाहेर खेळत होती. आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलं घरात आली मुलं व जावेने पाणी टाकून आग विझवली.गंभीर अवस्थेत शोभा हिस घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शिऊर पोलिसात गुन्हा दाखल होऊन ज्ञानेश्वर यास अटक करण्यात आली होती. मृत्यूपूर्वी मयत शोभा हिने नोंदविलेल्या जबाबनुसार सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासले. शिऊर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर.व्ही.वारंगुळे यांनी घेतलेला शोभाचा मृत्यूपूर्व जवाब व साक्ष महत्वाची ठरली. आरोप सिद्ध झाल्याने ज्ञानेश्वर यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहियोद्दीन एम.ए.यांनी ही शिक्षा सुनावली.