हाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित

अपराध्यांना अशी शिक्षा जी भविष्यात उदाहरण ठरेल : योगी आदित्यनाथ

राहुल-प्रियांका गांधींसह २०० जणांवर एफआयआर दाखल

लखनऊ : हाथरस प्रकरणात योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. एसपी, डीएसपी आणि हाथरसचे निरीक्षक यांच्यावर कारवाई झाली आहे. या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांची नार्को पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे विद्यमान एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि इतर काहींवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस कर्मचारी, फिर्यादी, पोलीस ठाण्याचे प्रतिवादी या सर्वांची पॉलिग्राफी चाचणी केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशातील योगी सरकार हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात आता कारवाई करताना दिसत आहे. सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही डीएम प्रवीण कुमार यांच्यावर आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर धमकी आणि दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

गुरुवारी एक व्हिडिओ समोर आला असून त्यात हाथरसचे डीएम पीडितेच्या कुटुंबाला धमकावताना दिसत आहेत. हाथरसचे डीएम म्हणत आहेत की मीडियाचे लोक निघून जातील, पण प्रशासनाला येथेच रहावे लागेल. त्यांना धमकावले जात असल्याचे हाथरसच्या पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. हातरस प्रशासनाकडूनही पीडितेच्या अंत्यसंस्कारांबाबत विचारपूस केली जात आहे. रात्री पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हाथरस प्रशासन या निर्णयामुळे अडचणीत आला आहे.

14 सप्टेंबर रोजी हाथरस येथे राहणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेची जीभ कापली आणि तिचा पाठीचा कणा देखील तोडला असा आरोप आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आले. मंगळवारी सकाळी पीडितेचा सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.

हाथरसचे डीएम आणि एसपी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. दरम्यान, सीएम योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा केले जाईल असे म्हटले आहे.

हाथरस सामुहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला आहे. यूपी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय? असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला. देशभरातुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तरप्रदेश पोलिसांवर आरोप केले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक महत्वपूर्ण ट्विट केलं आहे.
ते म्हणतात,”उत्तर प्रदेशातील माता-भगिनींचा सन्मान आणि स्वाभिमानाला ठेस पोहचविण्याची केवळ कल्पना करणाऱ्यांना देखील कठोर शासन केले जाईल. या अपराध्यांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एक उदाहरण ठरेल.उत्तरप्रदेश सरकार हे प्रत्येक माता भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे हे आमचं वचन आहे.” असे ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले.

राहुल-प्रियांका गांधींसह २०० जणांवर एफआयआर दाखल

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल २०० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गौतमबुद्ध नगर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे.राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यमुना एक्स्प्रेस वे वर पायी चालण्यास सुरवात केली. यामुळे एक्सप्रेस वे दोन्ही बाजूंनी जाम झाला होता. 

कलम १४४चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम १८८, २६९, २७०अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले होते. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा गुरूवारी सकाळी दिल्ली येथून हाथरस येथे बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, त्यांचा ताफा ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेस-वे येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवला. त्यानंतर घटनास्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी ताफा अडविल्यानंतर राहुल आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांनी हाथरस येथे पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राहुल गांधी यांना नोएडा पोलिसांनी अटक केली. राहुल गांधी यांनी महामारी कायद्याचे उल्लंघन केले असून त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुढे जाऊ देणे शक्य नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावेळी राहुल गांधी यांनी आपणास पोलिसांनी लाठी मारून धक्काबुक्की करून खाली पाडल्याचाही आरोप केला. महामारी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करावी लागल्याचे नोएडा पोलिसांनी सांगितले. राहुल गांधी यांना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण देशभरात आक्रमक पावित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलन केले.