अर्पिताच्या दुसऱ्या घरातूनही ५ किलो सोने आणि कोट्यवधी रुपये जप्त

ईडीने रोख रकमेसह २९ कोटी रुपयांचे १० ट्रंक साहित्य ताब्यात घेतले

कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या बेलघरियातील निवासस्थानातून ५ किलो सोने आणि रोख रकमेसह सुमारे २९ कोटी रुपयांचे दहा ट्रंक साहित्य ताब्यात घेतले. ईडीच्या तपास पथकांनी रात्रभर अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावर कारवाई केली.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी अर्पिता मुखर्जीच्या आईच्या नावे असलेल्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील बेलघरिया क्लब शहरातील फ्लॅट आणि इतर तीन संपत्तींची झाडाझडती घेतली. यावेळी अर्पिता मुखर्जीच्या बेलघोरिया येथील दोन फ्लॅटपैकी एक फ्लॅट ईडीने सील केला. यापूर्वी तिच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानातून २० कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. यामुळे तिच्याकडून आत्तापर्यंत जप्त केलेली एकूण रोख रक्कम ४० कोटींवर पोहोचली आहे. यासोबतच ईडीच्या अधिकाऱ्यांनी बल्लीगंज येथील व्यापारी मनोज जैन यांच्या घरावरही छापा टाकला. जैन हे राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांचे सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशनद्वारे सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या त्यावेळी पार्थ चॅटर्जीशिक्षण मंत्री होते. याप्रकरणी ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांनी २३ जुलै रोजी पार्थ चॅटर्जी आणि बंगालचे आणखी एक मंत्री परेश अधिकारी यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले आणि पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरातून २० कोटी रुपये रोख जप्त केले होते. त्यानंतर २४ जुलै रोजी पार्थ चॅटर्जी यांना अटक केली. पार्थ चॅटर्जीच्या अटकेपासून ईडीने त्याच्या अनेक बेहिशोबी मालमत्तेचा भंडाफोड केला, त्यापैकी पश्चिम बंगालच्या डायमंड सिटीमधील तीन फ्लॅट्स आहेत. केंद्रीय तपास एजन्सीने छापे टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली, ज्यात त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून २० कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त करून तिला अटक केलीय. गेल्या २३ जुलै रोजी टाकलेल्या धाडीत अर्पिता कडून २० कोटीहून अधिक रकमेसह मोबाईल फोन, कागदपत्रे, दस्तावेज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, परकीय चलन आणि सोने जप्त केले होते. त्यानंतर अटकेत असलेल्या अर्पिताच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीच्या आधारावर ईडीच्या कारवाईने वेग घेतला आहे.