मनोज जरांगे हे ठाकरे आणि पवारांची स्क्रिप्ट बोलत आहेत : फडणवीस

जरांगेंच्या गंभीर आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-मराठा आरक्षणसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली.पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या बंगल्यावर उपोषण करण्याच्या घोषणेवर ते म्हणाले की, सागर बंगला हा सरकारी बंगला आहे. सागर बंगल्यावर सरकारी कामासाठी कोणीही येऊ शकते. सागर बंगला सर्वांसाठी खुला आहे.  जरांगें पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांनी असे आरोप का केले, याची माहिती नसल्याचे सांगितले. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जी स्क्रिप्ट बोलत होते ती आता मनोज जरांगे यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. याचा अर्थ यामागे नक्कीच काहीतरी राजकीय षडयंत्र आहे. याबाबत सरकारकडे काही माहिती आहे, मात्र वेळ आल्यावर ते उघड होईल.  जरांगें पाटील यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या आरोपांवर पत्रकारांनी प्रश्न विचारू नये कारण ते सगळे खोटे आहेत हे पत्रकारांनाही माहीत आहे.

 जरांगेंनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल, असे फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला माहिती आहे. आजचा सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा विद्यार्थी, तरुणांसाठी आशेचं स्थान आहे. त्याची सुरुवात मी केलेली आहे. 

“मराठा आरक्षण मी उच्च न्यायालयात टिकवलेलं आहे. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं. माझं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ज्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती, ते मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर मराठा समाज विश्वास ठेवेल हे माणणाऱ्यांत मी नाही,” 

कोणावर आरोप करताय याची काळजी घ्या : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोणीही काहीही बोलेल आणि ते खपवून घेतले जाईल. कोणावर आरोप होत आहेत याची काळजी घेतली पाहिजे. निषेध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण आपण काय बोलतो याची काळजी घेणे गरजेचे आहे.