बावनकुळेंच्या वक्तव्याचे सत्ताधाऱ्यांमध्ये वाद ;बावनकुळेंची ‘त्या’ विधानावरुन पलटी

मुंबई,१८ मार्च  /प्रतिनिधी :-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपाबाबत विधान केले. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) केवळ 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटत असून, आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना खडे बोल सुनावले आहेत. फक्त 48 जागा लढवण्यात आम्ही मूर्ख आहोत का? असे शिरसाट यांनी बावनकुळेंना सुनावले.

काय म्हणाले शिरसाट ?
यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, “बावनकुळे यांच्या वक्तव्याचा काहीही संबंध नाही. बावनकुळे यांना तसे अधिकार दिलेले नाहीत. त्यांना अधिकार कोणी दिले… अशा वक्तव्यामुळे युतीला लाज वाटते, याचे भान त्यांनी ठेवायला हवे. केवळ 48 जागा लढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन निर्णय होईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करू द्या. बावनकुळे यांना कोणी अधिकार दिला? त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे ?

विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवेल, तर ४८ जागा शिंदे गटातील शिवसेनेला दिल्या जातील, असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

काय म्हणाले महादेव जानकर?

भाजप आणि शिवसेनेत वादात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी उडी घेतली आहे. “आम्हाला घेतल्याशिवाय जर शिवसेना भाजपने जागावाटप केलं असेल तर आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यास तयार आहोत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 ही जागा आम्ही लढवू”, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे. भाजपला जर आमची गरज वाटत असेल तर त्यांनी सोबत घ्यावं अथवा आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाहीत आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ, असंही यावेळी जानकर म्हणाले. तसेच येत्या विधानसभेत आपण काही जागांची मागणी केली असून त्यावर भाजप काय निर्णय घेते हे येत्या काळात स्पष्ट होईल, असं जानकर यांनी सांगितलं.

बावनकुळेंची ‘त्या’ विधानावरुन पलटी

आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे, त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलं होतं. मात्र, यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याने बावनकुळे यांनी आपल्या विधानावरुन पलटी मारली आहे. शिवसेना भाजप युती आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही, असे स्पष्टीकरणच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.