सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची आणि आताची स्थिती यावर श्वेतपत्रिका काढणार-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  संसदेमध्ये आज अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले, “ 2014 मध्ये ज्यावेळी आमच्या सरकारने सत्तेची धुरा सांभाळली त्यावेळी अर्थव्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि शासन प्रणाली व्यवस्थित करण्याची आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती. लोकांना दिलासा देण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि अतिशय गरजेच्या असलेल्या सुधारणांना पाठबळ देण्याची काळाची गरज होती.  आमच्या देश सर्वोपरि या ठाम धारणेच्या बळावर सरकारने यशस्वीरित्या ते करून दाखवले”.  

त्यावेळची अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था याविषयी बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, “ त्या वर्षांमध्ये निर्माण झालेल्या संकटांवर मात करण्यात यश आले आहे आणि सर्वंकष विकासासह अतिशय उच्च शाश्वत वृद्धीच्या कक्षेत अर्थव्यवस्थेला भक्कमपण स्थापित करण्यात आले आहे.” 2014 पर्यंत आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत, हे पाहाण्यासाठी आणि त्या वर्षांमध्ये केलेल्या गैरव्यवस्थापनांपासून केवळ धडा घेण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यावर सभागृहात श्वेतपत्रिका सादर करेल, अशी घोषणा त्यांनी केली.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, “ शासन, विकास आणि कामगिरी, प्रभावी वितरण आणि जनकल्याणाच्या आदर्श कामगिरीने सरकारला जे काही आवश्यक आहे ते साध्य करण्यासाठी  आणि आगामी वर्षांत आणि दशकात चांगला हेतू, वास्तविक समर्पिततेने आणि परिश्रमाने विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी जनतेचा विश्वास, आत्मविश्वास आणि आशीर्वाद मिळाला आहे.”