मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) ,२९ जानेवारी / प्रतिनिधी :-अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिने माझी माय सरस्वती, अग नाच नाच राधे, अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या बहारदार नृत्याने सर्वांची मने जिंकली. नंतर सुनील वाघ व सहकारी यांनी मराठी पाऊल पडते पुढे हा बहारदार संगीत गायन कार्यक्रम सादर केला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, पूज्य साने गुरुजी व प्रताप शेठजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर माजी विधान परिषद सदस्या स्मिता वाघ, अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, साहित्य संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष  डॉ.अविनाश जोशी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण कोचर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, अमळनेरला  मराठी साहित्य संमेलन व कॅबिनेट मंत्रीपद मिळाले या आनंददायी घटना घडल्या आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटन आमच्या हातून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे स्मिता वाघ म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  वसुंधरा लांडगे यांनी केले. डॉ.अमोघ जोशी यांनी आजच्या दिवसाची सर्व जबाबदारी सांभाळली.सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला 

आर्या शेंदूर्णीकर (कथ्थक) बहारदार संगीत व गीत गायन सुनील बळवंत वाघ, अनिल दत्तात्रय वैद्य,उज्वल शंकर पाटील,शिवानी सुनील वाघ, सुरश्री अनिल वैद्य, विजय गोविंद शुक्ल,मंगेश प्रभाकर गुरव, रूपक अनिल वैद्य, गिरीश दत्तात्रेय चौक, नितिन उत्तमराव गुरव, राऊफ शेख यांनी केले.