नीला सत्यनारायण यांच्या निधनाने संवेदनशील अधिकारी, लेखिका हरपल्या – यूपीएस मदान
मुंबई, दि. १६: माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या निधनाने एक संवेदनशील अधिकारी आणि लेखिका हरपल्या आहेत, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांनी लोकशाही बळकटीस प्राधान्य दिले होते. त्यांच्या कारकर्दीत निवडणूक प्रक्रियेत माहिती व तंत्रज्ञानाचा वापरास प्रारंभ झाला होता. ‘क्रांतिज्योती’ प्रकल्प, मतदारांसाठी ‘नोटा’ची सुविधा, मतदारांच्या बोटावर मतदानाची निशाणी करण्यासाठी शाईऐवजी मार्कर पेनचा वापर आदींची सुरूवात त्यांच्याच काळात झाली होती. प्रशासकीय अधिकारी आणि साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली होती, असेही श्री. मदान यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.
राज्यपालांना दुःख
सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त व माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.श्रीमती नीला सत्यनारायण या एक कर्तव्यदक्ष अधिकारी, संवेदनशील लेखिका, धीरोदात्त माता व चिंतनशील व्यक्ती होत्या. शासकीय सेवेतील तसेच जीवनातील प्रत्येक भूमिका त्या सकारात्मकतेने समरसून जगल्या. त्यांच्या निधनामुळे आपण एक उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक जाणीव असलेले व्यक्तित्व गमावले आहे. श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांना दुःख
राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर उमटविणारे अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल असे सांगून मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातील अनेक युवकांसमोर प्रशासकीय सेवेविषयीच्या प्रेरणास्थान होत्या. निवडणूक आयोगाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासारखी त्यांची इतरही अनेक कामे वैशिष्ट्यपूर्ण होती.
राज्याने कुशल प्रशासक, संवेदनशील साहित्यिक गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी त्या मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या निधनाने आपण एका कुशल प्रशासकाला, संवेदनशील साहित्यिकाला मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ राज्याची सेवा केली. राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडत असताना साहित्यक्षेत्रातही त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनानं एक कुशल प्रशासक, उत्तम साहित्यिक, संवेदनशील व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याचं बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.