चाचा नेहरू बाल महोत्सवास थाटात प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर,३ जानेवारी / प्रतिनिधी :- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत बालगृहातील प्रवेशित बालकांसाठी आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सवास मंगळवारी (दि.२) प्रारंभ झाला. बालगृहातील ४०० हून अधिक बालक या महोत्सवाचा आनंद घेत आहेत.

महिला व बालविकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभाग उपायुक्त हर्षा देशमुख, महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, बाल न्याय मंडळ अध्यक्ष श्रीमती एस.एस. जाधव, बालकल्याण समिती अध्यक्ष आशा शेरखाने, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे तसेच बाल कल्याण समितीचे अन्य सदस्य आदी उपस्थित होते.

निरीक्षण बालगृह, एन-१२, हुडको येथील प्रांगणात हा महोत्सव सुरु आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बालमहोत्सवात १४ गटांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.  तीनही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट प्रदर्शन करणारे बालक व खेळाडूंना पारितोषिकेही दिली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा महिल बालविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव यांनी दिली आहे.