महिला वकीलांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी बार काउन्सिल कटिबद्ध – ॲड पारिजात पांडे

छत्रपती संभाजीनगर,२ जानेवारी / प्रतिनिधी :- महिला वकीलांना बार कौन्सिलमध्ये ठळक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल कटिबद्ध असून उच्च न्यायालय कामकाजात मराठी भाषेचा सक्रीय वापर व्हावा यासाठी बार काउन्सिलकडून पाठपुरावा सुरू आहे असे प्रतिपादन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड पारिजात पांडे यांनी केले. 

अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत यांच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. लवकरच वकिलांची सनद मराठीत उपलब्ध होणार असूण पुण्यात अशा प्रकारची मराठी भाषेतून लिहीलेली पहिली सनद प्रदान करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे महिला वकिलांना ऐन कारकीर्दीच्या आरंभीच्या काळात वकिली व्यवसायातून काही काळ लांब राहावे लागते यामुळे वकीली व्यवसायातून महीला वकीलांचे होणारे ’ड्रॉप आऊट’चे प्रमाण याबाबत बार काउन्सिल संवेदनशील असून यासमस्येवरही उपाय शोधण्यात येईल पांडे म्हणाले. वकीलांसाठीची प्रशिक्षणात्मक व्याख्याने अर्थात – ‘स्टडी सर्कल’ हा कायमस्वरूपी प्रकल्प व्हावा हा बार कान्सिलचा ध्यास आहे. नवोदीत वकिलांच्या प्रशिक्षणासाठी ठाणे येथील कळवा येथे ॲडव्होकेट अकॅडमीसाठी जागा प्राप्त होणार असून उच्च न्यायालय स्तरावरदेखील नवोदीत वकिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे याबाबत बार काउन्सिल सकारात्मक आहे असेही ते म्हणाले.

     याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड संजीव देशपांडे, ॲड मिलींद पाटील, ॲड नितीन चौधरी, ॲड राजेंद्र उमप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांतचे अध्यक्ष ॲड श्रीकांत अदवंत यांनी प्रास्ताविक केले, ॲड स्वप्नील जोशी यांनी आभार मानले तर ॲड अतुल काळे यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांतच्या महामंत्री ॲड संगीता बागूल उपस्थित होत्या. सरकारी वकील उच्च न्यायालय, जिल्हा सरकारी वकील कार्यालय, सॉलिसीटर जनरल कार्याल, केंद्र सरकार यांच्यावतीने ॲड पांडे यांचा सत्कार करण्यात आला.