मराठा आरक्षण :मंत्री आणि जरांगे-पाटलांमधील चर्चा निष्फळ

“त्यांचे शब्द तेच पाळत नाहीत”

मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

जालना,२१ डिसेंबर/ प्रतिनिधी :-राज्य सरकारचे शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीला जालन्यातील अंतरवाली सराटीत गेले होते. यावेळी शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात बराच वेळ चर्चा चालली. मात्र, यावर कोणताही तोडगा निघाला नाही. कुणबी नोंदी असलेल्या संबंधीत नातेवाईकांना आणि रक्तातील सर्व सगेसोयरे यांना प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण ग्राह्य धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशीला देखील प्रमाणपत्र मिळावे, या मागणीवर जरांगे ठाम होते. मात्र, तसा निर्णय घेता येणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. यावर समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला समाज कमी पडला नाही. त्यांचे शब्द तेच पाळत नाहीत, असे जरांगे म्हणाले. यामुळे ही बैठक निष्फळ ठरली आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

महिलेवरुन तिच्या मुलांची जात ठरत नाही. वडिलांच्या दाखल्यावरुनच मुलांची जात ठरते. न्या. शिंदेंच्या अध्यक्षतेखाली रात्रंदिवस काम सुरु आहे. शेवटच्या माणसाची नोंद बघेपर्यंत कार्यवाही चालूच राहील. महिन्या दीड महिन्यात हा प्रश्न निकाली लागणार आहे. आम्हाला कायद्याने टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. मराठा आंदोलक मुंबईकडे जाण्याची बातमी आल्याने काळजी पोटी पोलिसांनी नोटीस दिल्या. पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते, असे गिरीश महाजन म्हणाले.

घराला दरवाजा दिला, मात्र कडी कोंडा दिला नाही – जरांगे

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलताना जरांगे म्हणाले, “समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला समाज कमी पडला नाही. त्यांचे शब्द तेच पाळत नाहीत. त्यांनीच लिहिले आहे, आम्हाला कशाला खोट ठरवतील. घोषणा मोठी झाली, घराला दरवाजा दिला मात्र कडी कोंडा दिला नाही. यात १०० टक्के मार्ग निघेल. कायद्याच्या चौकटीत जे आहे तेच आम्ही मागत आहोत. पुढच्या आंदोलनाचे २४ तारखेला बघू, ते सरकारच्या हातात आहे.” दरम्यान, राज्य सरकारचे शिष्टमंडळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे २४ डिसेंबर रोजी मनोज जरांगे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असून मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मराठा आंदोलनकर्त्यांनी शासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे  मनोज जरांगे यांची  अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने केलेल्या कार्यवाहीची त्यांना माहिती दिली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे  आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले की, सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी जे-जे काही करायचं आहे, ते सगळं करण्याची तयारी असल्याचे सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. आरक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, त्यामुळे शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घ्यावी. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. राज्यातील कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. जिल्हा प्रशासनासह न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे. आरक्षणासाठी ज्या त्रुटी असतील, त्या निश्चितपणे दूर केल्या जातील.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव निमित्त साखळी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उपोषणकर्त्यांना दिली. आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था, बंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही कारणाने समाजा-समाजात वितुष्टता येऊ नये, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.