विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना ग्रामपंचायत स्तरावर दिली जाणार- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली जालना जिल्ह्यात; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले उदघाटन

जालना,२७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत  देशाच्या सर्व भागात जाणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या ‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना ग्रामपंचायत स्तरावर  दिली जाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

       जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाचा शुभारंभ  करण्यात आला. या यात्रेच्या रथांना श्री. दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या ‘ विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

       श्री. दानवे म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2023 या कालावधीत  गरीबांसाठी, शेतकरी व तरुणांसाठी जी विकासाची कामे झाली आहेत, ही सर्व कामे जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांची माहितीही या यात्रेच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आपला भारत देश विकसनशील देश असून आपल्याला विकसित देशाच्या यादीत समावेश करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्या दृष्टीने पुढील 25 वर्षाचा विचार करून पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार नारायण कुचे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

       जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली, त्याअंतर्गत पंचवार्षिक योजना पुढील पाच वर्षाचा विकास व प्रगतीचा दृष्टीकोन समोर ठेवून कार्यान्वित करण्यात येत असतात. हा पाच वर्षाचा आराखडा देशपातळीवर प्रभावीपणे राबविण्यात येवुन विकास साधला जातो. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत. या योजनांचा जनतेने अवश्य लाभ घ्यावा.

 ‘विकसित भारत संकल्प यात्रा’या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत या योजना पोहचविणे, या योजनाच्या माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागृती निर्माण करणे, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व सूचना जाणून घेणे हे या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा मुळ उद्देश आहे.