बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं!-राहुल नार्वेकरांचा संजय राऊतसह आदित्य ठाकरेंना टोला

सिंधुदुर्ग ,२७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे कायम सत्ताधारी सरकार पडण्याची भाषा करत असतात. त्यांनी दिलेल्या वेळा निघून गेल्या तरी सरकारला अजून कोणताही धोका पोहोचलेला नाही. मात्र, त्यांच्या टीका सुरुच असतात. यावरुन आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊतसह आदित्य ठाकरेंना चांगलेच खडे बोल सुनावले. ‘सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये’, असा टोला राहुल नार्वेकरांनी लगावला आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, सरकार पडायचं असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असतं. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडतं. बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं. या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या असल्याने त्यांनी बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार

आमदार अपात्रतेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले. राहुल नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण त्यासाठी कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहोचू देणार नाही, विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे नार्वेकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी अशी वक्तव्यं करु नयेत

पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) नाही तर विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे अशा प्रकारची वक्तव्यं आदित्य ठाकरेंनी करू नयेत. जर या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावे, अशा प्रकारचं वक्तव्य करत नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारने या निवडणुका लवकर व्हाव्यात असे आपले म्हणणे दिले आहे. परंतु याचा निकाल न लागल्यामुळे या निवडणुका घेता येत नाहीत, असे नार्वेकर म्हणाले.