छत्रपती संभाजीनगर येथील साता-याचे श्री खंडोबा देवस्थान जेजूरीचे प्रतीरुप

चंपाषष्टी आज साजरी केली जात आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख  

ज्योती संजय पाटील (वाळुंज)

ज्योती संजय पाटील (वाळुंज)

त्रपती संभाजीनगर हे जगातील एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सातारा हे छोटेसे खेडे होते, परंतू आता ते महानगर पालिकेच्या हदिदत आले आहे. ते छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या ८ कि.मी. अंतरावर आहे. सातारा हे अनेक वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला उंच डोंगराच्या कुशीत आणि दाट झाडी मध्ये असलेले जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्री खंडोबाचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. महाराष्ट्राचे पूजनीय आणि लोकप्रिय दैवत असलेल्या खंडोबाचे जागृत देवस्थान सातारा येथे आहे. येथील खंडोबा यात्रा महादेवस्थान जेजूरी प्रमाणेच लोकप्रिय आहे. म्हणून याला जेजूरीचे प्रतिरुप मानतात.श्री खंडोबा दैवत जागृत, नवसाला पावणारे व सातारा परिसराला, छत्रपती संभाजीनगर शहराला भरभराट देणारे मानले जाते. शहराच्या दक्षिण भागात वसलेल्या आणि गेल्या झपाटयाने वाढलेल्या साता-यात येळकोट यळकोट जय मल्हार हा जयघोष घुमायला लागला आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी मार्तड, श्री खंडोबा हा संबंध राज्यातील अनेकविध जमातीचे श्रध्दास्थान, कुलदैवतम्हणुन हे खंडोबा देवस्थान प्रसिध्द आहे. श्री खंडोबा अनेक नावांनी पुजला जातो. त्यामध्ये मैलार, मल्हारी मार्तंड, म्हाळसापती, म्हाळसाकांत ही नावे सर्व परिचित आहेत.मल्हारी मार्तंड श्री खंडोबाचे महाराष्ट्रात ६ जागृत ठिकाणे आहेत. ५ ठिकाणे हे कर्नाटकात आहेत.

साता-याची भौगोलिक व ऐतिहासिक ओळख:-

शहराच्या मुख्य बसस्थानकापासून सूमारे ११ कि.मी. (दक्षिणेस) अंतरावर रमणिय सृष्टी सौदर्याने नटलेल्या डोंगर पायथ्याच्या खाली मध्यम उंची स्थानी सातारा हे ठिकाण आहे. अत्यंत वैभवशाली दिवस खेडे असतांना या गावाने उपभोगलेले आहेत. कारण सातारा निजाम राजवटीतजहागिरीचे मुख्य ठिकाण होते. हैद्राबाद संस्थानात (बारागाव) जहागिरी असलेले सातारा गाव गावकोटात सूरक्षित होते. दोन वेशी (तटबंदीचे मुख्य व्दार) असेलेल्या सातारा गावात जहागिर वाडा, न्यायमुर्ती कचेरी आणि इतर कारभारांचे एक चौक, दोन चौक असे भव्य वाडे होते. या चिरेबंदी वाड्यांमध्ये हैद्राबाद संस्थानच्या जहागिरीचा कारभार चालत असे. न्यायदान पासून टपालापर्यत सर्व कामें इथून चालत असे.पूर्वी शके १४००ते १५०० दरम्यान मुळ खंडोबा देवस्थान हे साताऱ्याच्या दक्षिणेस असलेल्या मोठया डोंगरावर होते. हे स्थान आजच्या साताऱ्या पासून ५ कि.मी. अंतरावर आहे. त्यावेळच्या परिस्थितीनुसार लोक उंच डोंगरावर सूरक्षित ठिकाणी आपली वसाहत करत होते आणि त्याठिकाणी आपल्या आराध्य देवतांची स्थापना करत असत.

आपले आराध्य दैवत हे बहूतेक ठिकाणी डोंगरावर किंवा किल्ल्यावर असल्याचे आपल्याला दिसून येते. जिथे जिथे लोकवस्ती तिथे तिथे आपले कूल दैवत, कूलस्वामिनी, पिर-पैगंबर यांची प्रतिष्ठापना ते लोक करत असत. त्यामुळे पूर्वीचे मूख्य खंडोबा देवस्थान हे डोंगरावर होते. आजही त्या ठिकाणी भग्नावस्थेत गवळी लोकांचे वाडे नामशेष होत चाललेले गोलाकार चौकोनी पाया भरणीचे दगड रांगेत लावलेले दिसून येतात.अगदी डोंगरात एका टोकावर भव्य काळया दगडावर कोरीव काम केलेले हेमाडपंथी पुर्वाभिमुख श्री खंडोबा मंदीर उभारलेले आहे. हे मंदीर एका चौथ-यावर चोहोबाजूनी दगडीकाम केलेल्या स्वरुपाचे आहे. त्याच ठिकाणी निवासी खोल्या जमिनदोस्त झालेल्या दिसतात. फक्त मुर्तीवरील कळसाचा भाग तेवढा शिल्लक आहे त्यावर देखिल काटेरी झाडे-झूडपे यांची वाढ झालेली दिसून येते. हे ऐतिहासिक मंदिर औरंगाबाद जवळील बोरसर येथील कूलकण्यांनी बांधल्याचे सांगतात. तर इ.स.१७६६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. परंतू मंदिराच्या अपूर्ण स्थितीमुळे बांधकाम अपूर्ण राहिले की त्याची हानी झाली याची माहिती मिळत नाही. मंदिराच्या गाभा-यात एका शिळेवर घोडयावर स्वार झालेले श्री खंडोबा दर्शविण्यात आलेले आहे. हे मंदिर कोणी कुठल्या काळात निर्माण केले याचा उल्लेख कोठेही आढळून येते नाही. वर्षातून एकदा पौष महिन्याच्या तिस-या रविवारी सातारा गावातून पठारावर पालखी (खंडोबाची) देव भेटीला जाते. या पालखी सोहळ्यात भाविक मोठया संखेने सहभागी होतात. श्री खंडोबा मंदिराच्या मागे साधारण ३० बाय ४० परिघात एक चिरेबंदी तळे आहे. हा अपूर्व ठेवा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.साता-याच्या या डोंगरामध्ये दोन लेण्या पहायला मिळतात. तर डोंगराच्या वरच्या बाजूला सासू-सूनेचे दोन तलाव आहेत. वरच्या एका लेणीमध्ये खंडोबाचे जाते आहे. त्या जात्यातून पूर्वी भंडारा पडत असत अशी अख्यायिका आहे.


खंडोबा मंदिराची माहिती

सर्व सामान्यांचा देव म्हणजे खंडोबा. छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ सातारा गावात खंडोबाच्या जागृत अकरा देवस्थानापैकी चौथे स्थान म्हणून ओळखले जाते. खंडोबा मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. पेशवे काळातील स्थापत्यशैलीचे अतिशय सूंदर मंदिर असून मराठा वास्तूशैलीतील विरांनी या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगण्यात येते. मंदिर परिसर हा गर्भग्रह, सभा मंडप, व भव्य प्रवेशव्दार यामध्ये विभागलेला असून एका उंच चौथ-यावर मंदिर बांधलेले आहे. मंदीराच्या गाभाऱ्याखाली एक पूरातन बारब आहे तीला जाण्यासाठीचा रस्ता आता बंद करण्यात आला आहे. या वर्षीच्या परतीच्या पावसाने ही बारब पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्या खालूनपाण्याचा पाझर वाहतांना आपणास दिसतो. प्रवेशद्वाराचे बांधकाम साधे असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी आठ पाय-या आहेत. आवाराचा पूर्व दरवाजा मोठा असून दरवाज्यावर नगरखाना आहे. उत्तर बाजूला दिपमाळ तर मंदिराच्या पूर्वेस मंडपाचा चौथरा दिसतो. या चौथ-याच्या चारही बाजूच्या भिंतीचा तळ व मंडपाचे १९ खांबाचे तळ नजरेस पडतात. मंदिराचे बांधकाम अर्धवट झाल्याचे दिसते. मंदिरगाभारा बाहेरुन ताराकाकृती करण्यात आले आहे. मंदिरातील अर्धमंडपात वरच्या भागात गजलक्ष्मी, शिवशाई, विष्णू, आणि कृष्णाची सूंदर शिल्प कोरलेले आहेत. मुख्य गर्भगृहात जाण्यापूर्वी अंतराळ भागात दक्षिण दिशेला ब्रम्हाची उत्पत्ती व शिल्प मालिका कोरलेली आहे. त्याखालील अलंकार पटटी मध्ये पोपटपक्षाची अलंकृत असलेली शिल्प पटटी आहे. गर्भगृहाच्या मधिल भागात श्री मच्छ, श्री कच्छ, श्री वराह, श्री नरसिंह, श्री वामन अशा दहा विष्णू अवतार कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशव्दाराच्या लगाड बिंबा वर गणेश मूर्ती कोरलेली आहे. त्यावर नंदीवर बसलेले शिवपार्वतीची मूर्ती कोरलेली आहे. त्याच प्रमाणे राम- लक्ष्मण-जानकी , श्री महाविष्णू, श्रीकृष्ण, श्री पांडूरंग व कशकी कलियुग हे देखिल विष्णू अवतार दाखवले आहेत. उत्त्तर दिशेला श्रीकृष्ण लिला विणूधारी गाई गौळणी यांची शिल्पे कोरलेली आहेत. आपण मुख्य गर्भागृहात प्रवेश केल्यास घंटा नाद कानावर पडतो. तसेच पूढे गेल्यावर आपल्याला आपल्या कूल देवताचे दर्शन होते.

खंडोबाची मूर्ती मध्यम उंचीच्या दगडावर विराजमानझालेली आहे. ती मूर्ती पाषाणाची असून त्याची ऊंची साधारण ३ फुट असल्याचे समजते. ती मूर्ती पूष्प, त्रीपूडगंध, बेल, भंडारा याने माखलेली असते. दूस-या बाजूला अभिषेकाची मूर्ती व महादेवाची पिंड आहे मूर्तीच्या उजव्या बाजूला घोडयावर स्वार झालेली मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेतले की समोरचे दृश्य पहाताच या मल्हारी मार्तंडाला आपण खंडोबा का म्हणतो याचा उलगडा होतो. त्याच्या समोरच दिसते ती दूधारी जमदाड किंवा दूधारी खंडा-खड्ग (तलवार) या तलवारीची उंâची साधारण ९ फुट आहे. या तलवारीचा आकार मुळापासून ते टोकापर्यत भाल्याच्या पात्याप्रमाणे आहे. प्रदक्षिणा घालत असतांना मंदिराच्या बाहय भागाचे कोरीव काम पहात पहात आपण दगडी दिपमाळे समोर येतो. ही दिपमाळ काळया पाषाणात असून त्याच्या दिवटया या हत्ती मूखासारख्या आहेत. व या दिपमाळेच्या बाजूला नगारखाना आहे. येथे यात्रा उत्सवात नौबत झडत असते. तेथे असलेल्यापिंपळाच्या झाडाखाली पहिले ओटा (पार) होता. त्याच्या बाजूला असणारे श्री गणेश व मारुतीचे दर्शन घेवून बाहेर निघाले की पश्चिम दिशेला जयमल्हार गड आहे. या गडावर पूर्वी भंडारा पडत असे अशी अख्यायिका आहे. खंडोबाचा गड चढल्यावर पठाराच्या मध्यभागी सासू-सूनेचे एकत्रित तळे आहे. त्या तळयाबदद्ल असे सांगण्यात येते की, सासू-सूनेच्या भांडणात सासू सूनेच्या छातीवर बसली. काहीही अपराध नसतांना सासूने छळ केला म्हणून सूनेने सासूला शाप दिला की, तूझ्या तळयाचे पाणी घाण होईल, त्यामध्येजिवजंतू पडतील आणि मी जर सत्य असेल तर माझ्या तळयातील पाणी स्वच्छ राहिल. आजही आपण निर्खून पाहिल्यास असे दिसते की एकत्र असलेले हे दोन तळे एकाचे पाणी थोडे गढूळ जिवजंतू असलेले दिसते. दूस-या तळयाचे पाणी अगदी स्वच्छ दिसते.भक्तांच्या भक्तीला प्रसन्न होवून खंडेराया सातारा गावात आले अशी कथा आहे.

दरवर्षी चंपाषष्ठीला येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी पूरण पोळी, खोबरे, रेवडी, भरीत व रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो व यळकोट यळकोट जय मल्हार या गजरात भंडा-याची उधळण केली जाते.पौष पौर्णिमा, सोमवती अमावस्या, चंपाषष्ठी, माघ पौर्णिमा, याला येथे जत्रा भरते.
रविवारचे महत्व

रविवार खंडोबा देवाचा वार म्हणून भाविक त्या दिवशी मोठया प्रमाणावर दर्शन घेण्यासाठी येतात.असे म्हणतात की महादेवाने कैलासपर्वतावर धर्मपुत्रांच्या रक्षणासाठी स्वरोचित मनूच्या १३ व्याकृतयुगाच्या समाप्तीस ८८,००० दिवस अवकाश असताना चैत्र शुध्द पौर्णिमेला दोन प्रहरी मार्तंड भैरव अवतार घेतला त्या दिवशी रविवार होता. त्यामुळे श्री खंडोबा भक्त दर रविवारी येथे दर्शनासाठी गर्दी करतात. घरी कोटंबा पूजन करतात. व वारी मागतात. नविन लग्न झाल्यानंतर ज्या प्रमाणे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी जेजूरीला जातात. त्याच प्रमाणे नवदाम्पत्य औरंगाबादच्या सातारे खंडोबाला देखील दर्शन घेण्यासाठी येतात. व त्याच ठिकाणी जागरण-गोंधळ घालतात.
चंपाषष्ठी:-या दिवशी मार्तंड भैरवाने मल्ल्या सुराचा वध केला तेव्हा देवांनी व गणांनी व ऋषिंनी देवाची पूजा चाफ्याच्या फुलांनी  केली व तो दिवस षष्ठीचा होता. म्हणून त्याला चंपाषष्ठी असे म्हणतात.चंपाषष्ठीला गावात देवाची मिरवणूक काढली जाते. सर्व गावकरी त्यावेळी देवांची पूजा करतात. संध्याकाळी देव पून्हा देवळात येतात. चंपाषष्ठीला देव जहांगिरदार (दीक्षित) यांच्या वाड्यात येतात.दिक्षितांचे वंशज दांडेकर परिवार परंपरेनुसार रुद्राभिषेक करून खंडेरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात व संध्याकाळी देव परत देवळात येतात. विजया दशमीला देवाची पालखी गावशिवारात मिरविली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यातसील व राज्याबाहेरील भाविक गर्दी करतात. चंपाषष्ठीला राक्षसांवर भगवंतांनी विजय मिळवला याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खंडेरायाचे ६ दिवसांचे नवरात्र बसवून मंदिरात व घरी उत्सव साजरा करतात. शेवटच्या दिवशी देव सिमोल्लंघन करतात.

(लेखिका कांचनवाडीतील सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयात ग्रंथपाल आहेत.)