राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवी दिल्ली, 1 जून 2020
या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पंचविसाव्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. या विद्यापीठाशी संबंधित संपूर्ण वैद्यकीय आणि वैज्ञानिक समुदायाचे मी अभिनंदन करतो.
या इतक्या वर्षांमध्ये, तुम्ही औषधाच्या प्रणालींचे अध्यापन तसेच प्रशिक्षणात उत्तम कार्य करत आहात.
25 वर्षे म्हणजे हे विद्यापीठ आपल्या तारुण्यात आहे. हे वय अधिक उत्तुंग विचार करण्याचे आणि त्याहूनही चांगले करण्याचे आहे. मला विश्वास आहे की विद्यापीठ आगामी काळातही उत्कृष्टतेच्या नवीन उंची गाठत राहील. कोविड -19 परिस्थिती हाताळण्यात कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांचे मी कौतुक करू इच्छितो. मित्रांनो, सामान्य काळात, नक्कीच मोठ्या प्रमाणावर हा र्वधापन दिन साजरा झाल असता. मात्र जागतिक महामारीच्या काळात हे शक्य नाही. हा खास दिवस साजरा करण्यासाठी मला बंगळुरूमध्ये तुम्हा सर्वांबरोबर सहभागी व्हायला आवडले असते.
परंतु, आज जग दोन विश्व युद्धांनंतर सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. ज्याप्रमाणे जागतिक युद्धापूर्वी आणि नंतरच्या काळात जग बदलले त्याचप्रमाणे कोविड पूर्वीचे आणि नंतरचे जग वेगळे असणार आहे.
मित्रांनो, अशा वेळी, जग आपल्या डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि वैज्ञानिक समुदायाकडे आशा आणि कृतज्ञतेने पाहत आहे. जगाला तुमच्याकडून सेवा आणि उपचार दोन्ही हवे आहे.
मित्रांनो, कोविड -19 विरुद्धच्या भारताच्या धाडसी लढ्याच्या मुळाशी वैद्यकीय समुदायाची आणि आपल्या कोरोना योद्ध्यांची मेहनत आहे. खरं तर, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सैनिकांसारखे असतात, परंतु त्यांना सैनिकांचा गणवेश नसतो. विषाणू एक अदृश्य शत्रू असेल, परंतु आमचे कोरोना योद्धा, वैद्यकीय कर्मचारी अजिंक्य आहेत. अदृश्य विरूद्ध अजेयांच्या लढाईत आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा नक्कीच विजय होईल. मित्रांनो, यापूर्वी जागतिकीकरणावरील चर्चेत आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले. आता जगाने एकत्रित होऊन विकासाच्या मानवता केंद्रित बाबींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आरोग्य क्षेत्रात प्रगती करणारे देश पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे ठरतील. मित्रांनो, गेल्या सहा वर्षांत आपण आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणात अनेक उपक्रम हाती घेतले.
आम्ही चार स्तंभांवर व्यापकपणे काम करत आहोत.
पहिला आहे – प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा. यात योग, आयुर्वेद आणि सर्वसाधारण तंदुरुस्तीचे महत्त्व समाविष्ट आहे. चाळीस हजाराहून अधिक निरामय केंद्रे उघडण्यात आली आहेत जिथे जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. स्वच्छ भारत मिशनचे यश हे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.
दुसरा आहे -परवडणारी आरोग्यसेवा . आयुष्मान भारत- जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना भारतात आहे. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत एक कोटी लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे. या योजनेच्या लाभार्थींमध्ये महिला आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्यांचा समावेश आहे.
तिसरा स्तंभ आहे- पुरवठा साखळीत सुधारणा. आपल्यासारख्या देशात योग्य वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षणाची पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय किंवा पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुनिश्चित करण्यासाठी काम चालू आहे.
देशात आणखी 22 एम्स स्थापनेत वेगाने प्रगती झाली आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही एमबीबीएससाठी तीस हजार जागा आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पंधरा हजार जागा निर्माण करू शकलो. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी वाढ आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा नवीन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने संसदेच्या कायद्याद्वारे घेतली आहे. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हे महत्वाचे ठरणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या समान होईल.
चौथा स्तंभ आहे – मिशन मोड अंमलबजावणी – विचारपूर्वक कल्पना कागदावर उतरवल्यास त्या केवळ चांगली कल्पना बनून राहतात. आणि एक चांगली कल्पना उत्तम प्रकारे अंमलात आणली तर ती एक सर्वोत्तम ठरते. म्हणूनच, अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे आहे.
येथे, मी भारताच्या राष्ट्रीय पोषण अभियानाचे यश अधोरेखित करू इच्छितो जे तरुण आणि त्यांच्या मातांना मदत करत आहे. 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी भारत 24*7 काम करत आहे. 2030 च्या जागतिक उद्दीष्टापेक्षा हे पाच वर्ष अलिकडे आहे. मिशन इंद्रधनुषने आपल्या लसीकरणाच्या वार्षिक वाढीच्या दरात चार पट वाढ केली आहे. मित्रांनो, 50 हून अधिक विविध संलग्न आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी नवीन कायदा करायला केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली. हा कायदा एकदा मंजूर झाल्यानंतर देशात निम -वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता दूर होईल. तसेच इतर देशांना कुशल संसाधनांचा पुरवठा करण्यात भारताला हा कायदा मदत करेल.
मित्रांनो, तीन गोष्टी आहेत ज्यावर मी जास्तीत जास्त चर्चा आणि सहभागासाठी विनंती करतो.
एक आहे – टेली-मेडिसिनमध्ये प्रगती. टेली-मेडिसिन मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय करणार्या नवीन मॉडेल्सचा आपण विचार करू शकतो का?
दुसरे आरोग्य क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ शी संबंधित आहे. प्रारंभिक लाभ मला आशावादी करतात. आमच्या देशांतर्गत उत्पादकांनी पीपीईचे उत्पादन सुरू केले आहे आणि कोविड योद्धांना सुमारे 1 कोटी पीपीई पुरवठा केला आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व राज्यांना 1.2 कोटी ‘मेक इन इंडिया’ एन -95 मास्क पुरवले आहेत.
तिसरे म्हणजे- आरोग्यदायी समाजासाठी आयटीशी संबंधित साधने. मला खात्री आहे की तुमच्या मोबाईलवर आरोग्यसेतु अॅप आहे. 12 कोटी आरोग्य जागरूक लोकांनी ते डाउनलोड केले आहे. हे कोरोना विषाणू विरूद्ध लढ्यात खूप उपयुक्त ठरले आहे.
मित्रांनो, मला तुम्हा सर्वाना भेडसावणाऱ्या चिंतेची जाणीव आहे. जमावाच्या मानसिकतेमुळे, आघाडीवर काम करणारे, कर्तव्य बजावणारे डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि इतर हिंसाचाराला बळी पडत आहेत. मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे – हिंसा, गैरवर्तन आणि असभ्य वर्तन स्वीकारार्ह नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत. आघाडीवर असलेल्यांना आम्ही पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षणही दिले आहे.
मित्रांनो, गेल्या 25 वर्षात या विद्यापीठाचा यशस्वी प्रवास पाहून मला आनंद झाला , ज्याने या आव्हानात्मक काळात गरीब आणि गरजू लोकांची सेवा करणारे हजारो वैद्यकीय आणि निम -वैद्यकीय कर्मचारी तयार केले आहेत. मला खात्री आहे की विद्यापीठ उत्कृष्ट दर्जाचे आणि क्षमता असलेले आरोग्य कर्मचारी घडवत राहील जे राज्य आणि देशाचा गौरव वाढवतील.
धन्यवाद. खूप खूप धन्यवाद