छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सराफा दुकानावर धाड

छत्रपती संभाजी नगर: ईडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी छापेमारी सुरु असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला आहे. काल दुपारी सुरु झालेली छापेमारीची कारवाई अजूनही सुरुच असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

बाफना ज्वेलर्स या शहरातील एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला. काल दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कर विभागाचे पथक दुकानात तपास करीत होते. दुकानातील कर्मचाऱ्यांना या वेळेत दुकानातच थांबवून ठेवण्यात आले होते. तर आज दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच आहे.कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही छापेमारी केल्याच समजत आहे. तर कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद करून, त्यानंतर चौकशी सुरु केली. तसेच या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी-विक्री संबधित कागदपत्रे तपासली आहे. सोबतच वेगवेगळ्या बिलांची तपासणी करण्यात येत असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात आहे. तर संबधित ज्वेलर्सने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय असून, त्यानुसार चौकशी केली जात असल्याची माहिती देखील मिळाली आहे. तर या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अजूनही कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.