धक्कादायक! संसदेची सुरक्षा वाऱ्यावर

संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश, चौकशी समिती स्थापन

प्रेक्षक गॅलरीतून दोघांच्या सभागृहात उड्या

नवी दिल्ली ,१३ डिसेंबर / प्रतिनिधी :-  सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु आहे. यावेळी संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक दिसून आली. संसदेच्या लोकसभा सभागृहात कामकाज सुरु असताना दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. उल्लेखनीय म्हणजे 2001 मध्ये आजच्याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता.

दोन युवकांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन खासदार बसतात त्या ठिकाणी उड्या मारल्या. यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. कामकाजावेळी घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीचं नाव हे सागर असल्याचं सांगितलं जात आहे. हे दोघे खासदाराच्या नावाने आलेल्या लोकसभा व्हिजीटर पासवर संसदेत आले होते. हे दोघे म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले असल्याची माहिती खासदार दानिश अली यांनी दिली आहे.

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी गलरीतून सभागृहात उड्या मारत काहीतरी फेकलं. ज्यामधून गॅस बाहेर येत होता. यानंतर खासदारांनी यांना पकडलं आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना सभागृहातून बाहेर काढलं. घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहाच कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. घडलेला प्रकार हा निश्चितपणे सुरक्षेचे उल्लंघन आहे. कारण आज आपण २००१ मध्ये ज्यांनी बलिदान दिलं त्यांची पुण्यातीथी साजरा करत आहोत.

नेमकं काय घडलं?

शुन्य प्रहरादरम्यान भाजप खासदार खरगेन मुर्मू बोलत असताना एका व्यक्तीने लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यानंतर त्याच्या मागे लगेच दुसऱ्याने देखील उडी मारली. यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. काही खासदारांनी मिळून या दोघांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केलं. या दोघांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर युनिटच्या स्पेशल सेलकडून या घुसखोरी करणाऱ्यांची चौकशी सुरु आहे.

या संपूर्ण घटनेत सहा जण सामील होते. यातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर दोघांचा तपास सुरू आहे.यांची नावे सागर, विक्रम, नीलम, अमोल आणि मनोरंजन आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि गुरूग्रामच्या सेक्टर ७च्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये एकत्र थांबले होते.हे घर विक्रमचे होते. येथे संसदेच्या आत घुसण्याबाबतचा कट रचण्यात आला होता.

लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही ४२ वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोघंजण संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन इथे कलर स्मोक घेऊन आंदोलन करत होते.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या लोकांकडून कोणताही मोबाईल फोन मिळालेला नाही. चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलीस पकडलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनचा शोध घेत आहे.

चारजण ताब्यात

ज्या पाच जणांना पोलिसांनी पकडले आहे त्यातील दोघांनी लोकसभेच्या दर्शक दीर्घा येथून उडी घेतली आणि जमिनीवर उडी मारली.या दोघांची ओळख मनोरंजन आणि सागर शर्मा अशी आहे. तर संसद परिसरात आंदोलनादरम्यान कॅन घेऊन धूर सोडणाऱ्यांची ओळख हरयाणातील जिंद जिल्ह्यातील खुर्द गावातील निवासी निलम आणि महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे अशी आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले हे चारही जण विविध शहरातील आहेत. असे असतानाही ते सगळे एकमेकांना कसे ओळखत होते असा सवाल आहे. जर चारही जण एकमेकांना ओळखत होते तर यांचा हेतू काय होता? किती वेळात त्यांनी संसदेत घुसखोरी करण्याची प्लानिंग केली. हे सगळे सवाल उपस्थित केले जात आहेत.

संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश, चौकशी समिती स्थापन

संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह खात्यानं दिले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाईल. अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख देखील या चौकशी समितीत असतील. ही समिती घटनेची कारणं शोधून काढेल, तसंच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत देखील शिफारसी करेल. 

केंद्रीय गृह खात्यानं अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल.