पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती-केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त मोती राम 

छत्रपती संभाजीनगर,१३ डिसेंबर / प्रतिनिधी :-धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. मोती राम,आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्री.मनोज कुमार आणि नीती आयोगाचे संशोधन अधिकारी श्री.शिवचरण मीणा या तीन सदस्यीय पथकाने आज 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबतची माहिती घेतली.
श्री.मोती राम म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास यंत्रणांनी नियोजनातून काम करावे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळीच करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. त्यामुळे पुढील वर्षी पीक कर्ज सहजपणे उपलब्ध करून देता येईल असे सांगितले.
श्री.गुप्ता यावेळी म्हणाले, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात पाण्याचे स्त्रोत शोधून पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विविध यंत्रणांच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे भूगर्भात संचयन करून भूजल पातळी वाढविण्यास मदत होत आहे. अटल भूजल योजना जिल्ह्यातील 55 गावात सुरू आहे.याशिवाय अन्य गावात तसेच पाणलोट क्षेत्रातील गावात देखील जलसंधारणाची कामे करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीची कामे हाती घेऊन जलसंधारणाला मदत करण्यात येत असल्याचे श्री. गुप्ता यांनी सांगितले.
पाणीसाठे वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले,पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यरत आहे.दुष्काळी परिस्थितीत दुष्काळी गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येतात.जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून देखील कामे करण्यात आली आहे.यापुढेही या अभियानातून कामे करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतीला सिंचनाची सुविधा आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने जलस्त्रोत बळकट होण्यास या अभियानाचा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.माने यांनी चार वर्षात पडलेला प्रत्यक्ष पावसाची माहिती दिली. सन 2020 मध्ये 102 टक्के, सन 2021 मध्ये 138 टक्के,सन 2022 मध्ये 110 टक्के आणि यावर्षी 71 टक्के तर सन 2023 – 24 मध्ये जून महिन्यात 26 टक्के,जुलैमध्ये 166 टक्के,ऑगस्ट मध्ये 17 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 75 टक्के पाऊस झाला. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 च्या हंगामात जिल्ह्यातील 7 लक्ष 57 हजार 853 शेतकऱ्यांनी 5 लक्ष 99 हजार 411 हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीचा कृषी,महसूल व विमा कंपनीकडून संयुक्तपणे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ.श्रीमती शिंदे यांनी लोहारा,वाशी आणि धाराशिव तालुक्यात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी आहे.पावसाचे पाणी वाहून जाते.वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याची भूगर्भात साठवून करणे आवश्यक आहे.जलसंधारणाची कामे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी पाणलोटाची कामे व रिचार्ज शाफ्टची कामे सुरू असून रिचार्जची जास्त कामे करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात बेसॉल्ट खडक असल्यामुळे पाण्याची साठवणूक कमी होते. शेतकरी व नागरिकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत व बचतीविषयी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती श्रीमती शिंदे यांनी यावेळी दिली.
मागील वर्षी 77 टक्के आणि यावर्षी 78 टक्के खरीप पिक कर्ज वाटप केल्याचे सांगून श्री.दास म्हणाले, बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक कर्ज खात्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे पीक कर्ज देण्यास अडचणी येत आहे. जिल्ह्यात पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. शेतकरी नगदी पिकाकडे वळला पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात 7 लक्ष 90 हजार पशुधन असल्याची माहिती डॉ.हुलसुरे यांनी दिली.दुष्काळी स्थितीत पाळीव जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद केली आहे.या निधीतून वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल.त्यामुळे पशूंना चारा उपलब्ध होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
सभेला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्री.गौरीशंकर हुलसुरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रंजन दास, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता ए. एन. मदने,विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी.जी राठोड,ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता आर. एम.ढवळे,वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मेघना शिंदे,उपविभागीय अधिकारी योगेश खारमाटे व गणेश पवार, उपकार्यकारी अभियंता (जलसंधारण) एस.एन. माने,उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर, शुक्राचार्य भोसले, विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक हरिओम सोळंके व कृषी उपसंचालक श्री.काशीद यांची यावेळी उपस्थिती होती.

केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळी स्थितीची पाहणी

जालना,१३ डिसेंबर / प्रतिनिधी :- केंद्रीय आंतर मंत्रालयीन समितीच्या पथकाने आज जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए.एल. वाघमारे व मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरिष हुंबर्जे यांचा समावेश होता. या पथकाने आज भोकरदन तालुक्यातील जुई धरण, पंढरपूरवाडी, हसनाबाद, फुलेनगर, पिंपरी या गावालगत असणाऱ्या शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन पिक परिस्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या पाहणी दरम्यान पथकासमवेत अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. कांबळे, तहसिलदार संतोष बनकर आदींसह कृषी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी आज केंद्रीय पथकाने केली. या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी ए.एल. वाघमारे व मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरिष हुंबर्जे यांचा समावेश होता. या अपथकाने छत्रपती संभजीन्गर तालुक्यातील तुळजापूर, चौका, मोरहिरा, धनवड व सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा, फर्दापूर आणि धनवट या गावांना भेटी देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान कृषी सहसंचालक तुकाराम मोटे, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, लतिफ पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने, तहसिलदार रमेश मूनलोड, मोहनलाल हरणे, गटविकास अधिकारी मीना रावताडे तसेच कृषी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.