ऊर्जा संवर्धन दिन विशेष:उज्ज्वल भविष्यासाठी वीज वाचवा!

ज्ञानेश्वर आर्दड

रवर्षी 14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन तर 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सर्व स्तरावरील उपभोक्त्यांना ऊर्जा बचतीचे महत्व अवगत करून दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर अत्यावश्यक वेळीच केला जावा या प्रमुख उद्देशामुळेच या संवर्धन दिनाचे आणि सप्ताहाचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धनाचा वाव आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे महत्त्व पाहता केंद्र शासनाने ऊर्जा  संवर्धन कायदा २००१ पारित केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून ऊर्जा वापर कमी होण्यासाठी विविध योजना तयार करण्याच्या अनेक तरतूदी आहेत. ऊर्जा  संवर्धनाचा प्रचार आणि प्रसार करून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे महत्त्व विविध घटकांना पटवून देणे हाही या कायद्याचा आणखी एक प्रमुख भाग आहे.     

मानवी जीवनात सामान्यत: अन्न्, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात. परंतू जागतीकी करणाच्या आजच्या युगात “ऊर्जा” अर्थात  “वीजे”चाही मूलभूत गरजांमध्ये समावेश झालेला आहे. आज ऊर्जेची गरज नैसर्गिक इंधनाचे साठे जसे, कोळसा, खनिज तेल, वायू यावरच भागवली जाते. इंधनाचे साठे मर्यादीत स्वरूपात असून कोळसा ११४ वर्षे, खनिज तेल २० वर्षे तर वायु केवळ ३६ वर्षे पुरेल एवढाच शिल्ल्क आहे. दैनंदिन जीवनात मोठया प्रमाणावर वापर होत असलेली विद्युत ऊर्जेची निर्मितीदेखील  मोठ्या प्रमाणावर कोळशापासूनच केली जाते. ग्लोबल वार्मिंग सारख्या जागतिक स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे जात असताना ऊर्जेचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणं अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर मानवाच्या एकूणच वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणल्याशिवाय आपल्या वसुंधरेचे रक्षण होणं अशक्यप्राय आहे. त्यामुळे विजेच्या बचतीचा मंत्र हाच ऊर्जा संवर्धनाचे खरे तंत्र ठरणार आहे.       

भारताने पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अलीकडेच सीओपी २६ मध्ये भारताने २०३० पर्यंत भारताच्या जिडेपी ची उत्सर्जन तीव्रता २००५ च्या तुलनेत ४५ टक्के पातळीपर्यंत कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे लक्ष्य निर्धारीत केलेले आहे. भारताची ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी ही निश्चितच कौतूकास्प्द आहे. आपली दळणवळण व्यवस्था ही पूर्णत: कच्च्या तेलावर, जीवाश्म इंधनावर आधारित आहे. भारताचा २००० सालापासून ऊर्जा वापर जवळपास दुप्पट झाला आहे. जो जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश आहे. सन २००७ साली दरडोई ६७२ किलोवॅट विजेचा वापर सन २०२२ साली १२५५ किलोवॅट झालेला आहे. ग्लोबल कार्बन प्रोजेक्‍ट या संस्थेने वाढती लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यामुळे भारतातील उत्सर्जन अलिकडच्या दशकात वाढले असल्याचे नमूद केले आहे. या वाढीमुळे भारत देश, चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश बनला आहे; २०२१ मध्ये भारताने ३.९ अब्ज मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य उत्सर्जित केले, जे जागतिक पातळीच्या एकूण ७ टक्के आहे. भारताचा आर्थिक विकास होत असतानाच कार्बन उत्सर्जन वाढत असल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.    

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मार्च २०२१-२२ च्या अहवालानुसार भारताची एकूण वीज निर्मिती ही १४ लाख ८४ हजार ४६३ गिगावॉट असून यामध्ये कोळशाची ऊर्जा ही ११ लाख १४ हजार ८११ गिगावॉट एवढी आहे. तर पाणी १ लाख ५१ हजार ६२७ गिगावॉट तसेच नवीकरणीय ऊर्जेचे प्रमाण १ लाख ७० हजार ९१२ गिगावॉट एवढे आहे. एकूणच ऊर्जा संवर्धना विषयी विचार करत असताना असे लक्षात येते की, भारताची ऊर्जा निर्मिती आजही कोळशावर अवलंबून आहे. दिवसेंदिवस विजेची वाढत जाणारी मागणी आणि पुरवठा यात ताळमेळ घालण्याच्या दृष्टिने विजेची बचत ही काळाची गरज बनलेली आहे. देशात इंधनाचे साठे मर्यादीत आहेत.कोळसा, तेल व गॅस मोठया प्रमाणावर आयात केली जातात. त्यामुळे आपल्या देशातील इंधन साठे भावी पिढीला उपयोगी ठरतील यासाठी ऊर्जेचा वापर अधिकाधिक कार्यक्षमतेने व काटकसरीने करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्तरावर स्थापीत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी, नवी दिल्ली यांच्या अहवालानुसार ऊर्जा संवर्धनासाठी पथदिवे आणि पाणीपुरवठा याक्षेत्रामध्ये 20 टक्के, घरगुती क्षेत्रात 20 टक्के, व्यावसायिक क्षेत्रात 30 टक्के, उद्योग क्षेत्रात 25 टक्के आणि कृषी क्षेत्रात 30 टक्के याप्रमाणे आपण ऊर्जेची बचत करू शकतो. याकरिता ऊर्जा संवर्धनासाठी उपलब्ध होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विजेची निर्मिती कोळशापासून करताना पाण्याचाही वापर मोठया प्रमाणावर केला जातो. ऊर्जा बचत केल्यास ऊर्जा बचतीसोबतच पाण्याचीही बचत होईल. तसेच प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षमता ही संस्कृती सर्व क्षेत्रात नागरिकांनी अंगिकारणे अत्यावश्यक आहे. यासाठी विदयार्थ्यापासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनी जागरूकपणे ऊर्जेचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर व्यक्तिश: प्रयत्न करण्याबरोबरच सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी त्यांच्या अखत्यारितील क्षेत्रात ऊर्जा संवर्धनासाठी पुढाकार घेऊन सुरवात करणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय क्षेत्रात ऊर्जा वापर उपकरणांची खरेदी करतांना ऊर्जा कार्यक्षमतेचे निकष विचारात घेणे गरजेचे आहे. तसेच ऊर्जा कार्यक्षमतेच्या निकषांवर आधारीत नवीन इमारती, रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा यंत्रणा यांची उभारणी करणे अत्यावश्यक आहे. आपल्या जीवनातील केंद्रस्थानी असलेल्या ऊर्जेबाबतची आपली उदासिनता व बेफिकीरी आपल्या व भावी पिढीकरिता घातक ठरू शकते. म्हणूनच ऊर्जेविषयी अधिक जागरूकता दाखवत ऊर्जेचे संवर्धन, म्हणजेच वसुंधरेचे रक्षण हा मूलमंत्र मनाशी, मेंदूशी घट्ट बाळगून ठेवायला हवा.   

आज आपण जगात वेगाने विकसित होत आहोत. या विकासाच्या प्रक्रियेत ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. वायू प्रदूषण, हवामान बदल, पर्यावरणीय आपत्ती अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऊर्जा संवर्धन हा पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. ऊर्जा संवर्धन म्हणजे उपलब्ध ऊर्जेचा अधिकाधिक कार्यक्षमतेने वापर करणे. ऊर्जा संवर्धन केल्याने ऊर्जेची बचत होते आणि पर्यावरणावर होणारा दबाव कमी होतो.

दैनंदिन जीवनातील ऊर्जा बचतीच्या काही सुलभ सुचना

१.   गरज नसेल तेंव्हा विद्युत उपकरणे आणि दिवे बंद करणे.

२.   वापरात नसेल तेंव्हा विद्युत उपकरणांचे मेन स्वीच बंद ठेवा. उदा. टि.व्ही., संगणक इ. यामुळे 15 टक्के ऊर्जा बचत होते.

३.   कार्यालयात व घरात सुर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.

४.   घरातील आतील भिंतींना व छताला फिकट रंग द्यावा.

५.   फ्रिज मध्ये जास्त बर्फ साचु देऊ नका तसेच वारंवार दरवाजा उघडु नका.

६.   वीजेच्या अती उच्च मागणी काळात म्हणजेच सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ६ ते १० या वेळेत मोठ्या प्रमाणावर मोठ्या वीज उपकरणांचा वापर टाळावा.

७.   वातानुकुलीन यंत्र (ए.सी.) पंख्यापेक्षा १५ पट जास्त ऊर्जा खर्च करते. ए.सी. चे तापमान २५ अंश से. एवढे ठेवावे.

८.   प्रकाश योजनेसाठी ऊर्जा बचत करणारे एल.ई.डी. बल्ब व ट्युबचा वापर करावा त्यामुळे ८० टक्के ऊर्जा बचत होते.

९.   बी.ई.ई.स्टार लेबल अथवा आय.एस.आय. प्रमाणित उपकरणांचा वापर करावा व त्याची नियमीत देखभाल करावी. शक्यतो सौर, पवन, बायोगॅस, बायोमास यासारख्या अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत साधनांचा वापर करावा.

१०. कमी अंतरासाठी वाहनांचा वापर टाळा, १ ते २ मजल्यासाठी लिफ्टचा वापर टाळावा.

(लेखक महावितरण छत्रपती संभाजीनगरचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)