लोकसभेतील घुसखोरीचे महाराष्ट्रात पडसाद, नागपूर अधिवेशनात गॅलरी पास बंद

नागपूर ,१३ डिसेंबर  /प्रतिनिधी :-देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या संसदेत दोन अज्ञानांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या आणि एकच गोंधळ उडाला. यानंतर या दोघांनी खासदारांच्या बेंचवरुन उड्या घेत लोकसभा अध्यक्षाच्या दिशेने जायला सुरुवात केली. यावेळी काही खासादारांनी या दोन्ही युवकांना घेरलं. यानंतर यांनी त्यांच्या बुटातून स्मोक कॅन बाहेर काढले आणि सभागृहात धूर केला. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर महाराष्ट्रातील नागूपर येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले आहे. राज्य विधिमंडळ सभागृहाचे गॅलरी पासेस देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसाठी गॅलरी पास देणं बंद केलं आहे.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली आहे.

संसदेच घडलेल्या या प्रकाराचे देशभर पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनात देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. आपणही याबाबत काळजी घ्यायला हवी असं म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी सुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असलीत तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. अधिकच्या पासेसची मागणी कोणीही करु नका.

विधानसभा अध्यक्षाच्या प्रतिक्रियेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या मुद्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना विनंती आहे की, आपण विधीमंडळाचे पासेस कमी करायला हवेत. अजित पवार यांनी केलेल्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जातील. या व्यतिरिक्त पास दिला जाणार नाही. दरम्यान, अधिवेशन कालावधीत विधिमंडळाच्या परिसरात गर्दी नको आणि सुरक्षा यंत्रणेवर अधिक भार पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.