दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे

जिल्हाधिकारी व पो​लिस अधीक्षकांची भूमिका ठरली महत्त्वाची

जालना,५ डिसेंबर / प्रतिनिधी :- परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून गांधी चौकात अन्नत्याग उपोषणास बसलेले दीपक रणनवरे यांनी मंगळवारी दुपारी आपले उपोषण मागे घेतले. जिल्हाधिकारी व जिल्हा पो​लिस अधीक्षकांची भूमिका यावेळी महत्त्वाची ठरली.

        परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सकल ब्राह्मण समाज संघर्ष समन्वय समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर पासून जालना शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. या उपोषणास लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. गेल्या आठ दिवसापासून अन्नत्याग उपोषणास बसलेले  दीपक रणनवरे यांची प्रकृती खालावली होती.

        पालकमंत्री अतुल सावे यांनी पुढाकार घेऊन उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या मागण्यासंदर्भात ​१३ डिसेंबर रोजी नागपूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्याबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मंगळवारी दुपारी उपोषणस्थळी येत उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांना दिले. यावेळी जिल्हा पो​लिसअधिक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, नगरसेवक अशोक पांगारकर, तहसीलदार छाया पवार  आदींची उपस्थिती होती. यांच्यासह हभप नानामहाराज पोखरीकर, भास्करमहाराज देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

        यावेळी बोलतांना उपोषणकर्ते दीपक रणनवरे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून समस्त  ब्राह्मण समाज हा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची मागणी करीत आहे. मात्र शासनाने आश्वसनाशिवाय काही एक दिलेले नाही, समाजाच्या मागणीनुसार आपण ​२८नोव्हेंबर पासून अन्नत्याग उपोषणास बसलो आहोत, ​१३ डिसेंबर रोजी नागपूर येथे ब्राह्मण समाजाच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत तोडगा निघाला नाही तर ​१४ डिसेंबर पासून आपण पुन्हा उपोषणास बसणार असल्याचा इशाराही रणनवरे यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी लेखी पत्र दिल्यानंतर रणनवरे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनीही उपोषण मागे घेण्यासंदर्भातक विनंती केली. समाजाचा उपोषण मागे घेण्यासंदर्भातला होकार आल्यानंतर रणनवरे यांनी भास्कर महाराज देशपांडे यांच्या हस्ते रसग्रहण करून आपले अन्नत्याग उपोषण मागे घेतले.         यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ बळवंत नाईक, सुरेश कुलकर्णी, आर.आर.जोशी, दिलीप देशपांडे, एस. एन. कुलकर्णी, संजय देशपांडे, कल्याणराव देशपांडे, आर. आर. जोशी, सिध्दीविनायक मुळे, भगवान पुराणिक, सतीश अकोलकर, रवींद्र देशपांडे, सुबोध किनगावकर, शुभांगी देशपांडे, विशाखा नाईक, श्रीकांत देशपांडे, सुमित कुलकर्णी, अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, संकेत मोहिदे, कृष्णा दंडे, विनोद कुलकर्णी, अभय शिवणगिरीकर, सुनील कुलकर्णी, गोपी मोहिदे, चैतन्य नाईक आदीसह ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तेली समाजाने दिला पाठिबा

ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास तेली समाजाने पाठिंबा देत तसे पत्र उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांना देण्यात आले.  यावेळी अशोक पांगारकर, अजय मिसाळ, राजेंद्र वाघमारे यांच्यासह तेली समाज बांधवांची उपस्थिती होती.